Site icon कार्यारंभ लाईव्ह

शिवसेना कुणाची याबाबत कुठलाही निर्णय घेऊ नका, सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश

supreme courte

supreme courte

वृत्तसंस्था । नवी दिल्ली
दि 4 : शिवसेना नेमकी कोणाची याबाबत आम्ही ऐकून घेत आहोत. तोपर्यंत निवडणूक आयोगाने त्याबाबत कुठलाही निर्णय घेऊ नये, असे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश एन.व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठाने निवडणूक आयोगाला दिले आहे.

सुप्रीम कोर्टात याप्रकरणी पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. या सुनावणीवेळी कोर्टाकडून हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे द्यायचं की नाही, याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. आम्हीच खरा शिवसेना पक्ष आहोत, असा दावा शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आला आहे. याबाबत आयोगाने लगेच कोणताही निर्णय घेऊ नये, अशा सूचना कोर्टाने दिल्या आहेत. त्यामुळे आता सोमवारी सुप्रीम कोर्टात नेमकं काय होतं, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील न्या. कृष्ण मुरारी आणि न्या. हिमा कोहली यांच्या तीन सदस्यीय पीठापुढे शिवसेनेच्या 16 आमदारांची अपात्रता, नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड, पक्षाने काढलेला व्हिप या मुद्द्यांवर बुधवारी दीड तास प्रारंभिक सुनावणी झाली. उद्धव ठाकरे यांच्या वतीने कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी, एकनाथ शिंदे गटाकडून हरीश साळवे, नीरज किशन कौल आणि महेश जेठमलानी तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला. हे प्रकरण व्यापक घटनापीठाकडे पाठविण्याचे संकेत सरन्यायाधीश रमणा यांनी 20 जुलै रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान दिले होते. त्यानंतर आज झालेल्या सुनावणीतही कोर्टाने यावर भाष्य केलं असून याबाबत निर्णय सोमवारी होणार्‍या सुनावणीवेळी घेतला जाण्याची शक्यता आहे.

Exit mobile version