Site icon कार्यारंभ लाईव्ह

मुषकाला आली भोवळ

MUSHAKRAJ

MUSHAK

बाप्पाची स्वॉरी याबारी जिल्ह्याच्या दक्षिणेकडून सुरू झाली. जिल्ह्याच्या बॉन्ड्रीत पाय टाकल्याबरूबर पहिला मान माझा मनत बीडचे खासदार जबरंग बप्पा गणपती बाप्पांच्या पुढ्यात आले. कामाख्या देवीवरून आणलेलं ब्रम्हपुत्रेचं पाणी त्यांनी गणपती बाप्पांच्या पायावर शिंपडलं. तेच पाणी तळहातावर घेऊन तिरुपती बालाजीवरून आणलेला चंदनाचा गंद हातावर उगळीत लालझर केला. करंगळी जवळच्या बोटाने तो गंद बाप्पाच्या कपाळी लावला. एका सद्गुरू बाबाच्या आश्रमातून आणलेल्या सुगंधी उद्बत्तीच्या पुढ्यातून चार उद्बत्त्या काढून त्या चेतवल्या. गंद आणि उद्बत्तीच्या सुगंधाने अवघा परिसर प्रसन्न झाला होता. लगोलग गणपती बाप्पाला एका टेम्पोच्या टपावर चढवण्यात आलं अन् तिथून मिरवणूक सुरू झाली. काल मुषकाने सांगितले होते, जबरंगबप्पा लैच हवेत उडायलेत म्हणून… पण गणपती बाप्पांना तसं काही जाणवत नव्हतं. इकडे मुषकाला कळून चुकलं बाप्पाच्या मनात काय सुरूये. मुषक हळूच बाप्पाच्या कानाजवळ आला आणि म्हणाला “म्या सांगीतलेला एक जरी शब्द खोटा निघाला तर तुम्ही सांगाल त्येच्या टांगाखालून जाईल. जबरंग बप्पा भेटल्या भेटल्या लैच गोड है. पण जसा जसा वेळ लांबत जाईल तसं तसं जबरंग बप्पा नेमके काय हे तुम्हाला उमगतील” गणपती बाप्पानं मुषकाकडे कटाक्ष टाकत त्यांच्या बोलण्याला मान हलवत प्रतिसाद दिला. आता ऊन पार डोस्क्यावर आलं होतं. सावल्या बुटक्या झाल्या होत्या. तोच जबरंगबप्पाचा पारा चढायला सुरूवात झाली.

“बालाजी कुठंय? आरं बालाजी कुठंय??” जबरंग बप्पा आपल्या यंत्रणेला आवाज करत होते. तितक्यात कुणीतरी गर्दीत जबरंगबप्पाला धक्का देतो. “अरे तुमाला समजत नाही का रेऽऽऽ तुम्ही एका खासदाराला धक्का देताय? जनतेतून निवडून आलेल्या खासदाराला तुम्ही धक्का देताय? बालाजी कुठंय? आरं मेला का? हिथं जीव जायची येळ आली” गोळ्या घी गोळ्या… मारतो का मला? 6 लाख 83 हजार 950 लोकांनी मतं केलीत मला” जबरंग बप्पाचा आवाज आता जास्त चढला होता. चढलेला आवाज पाहून मुषक पुन्हा गणपती बाप्पाच्या कानाजवळ जात हळूच म्हणले “हे तर कैच नै, पुरा पिक्चर अभी बाकी है. ह्याचं रक्तातील गोडाचं कमी जास्ती झालं की हे म्होरल्यावर नुस्ते डाफरतेत. फुसफुस करतेत. अन् म्होरला जर खैराचा खुटा असल तर मग बिच्चारा बालाजी गेलाच म्हणून समजा. आधीच बालाजीचा जीव बारीक. वयानबी बारीक. कधी कधी तर अख्ख्या जिल्ह्याचा राग बालाजीवर ववाळून टाकतात. कधी कुणाला हुस्काऊन लावायचं झालं तरीबी बालाजीच ह्यांच्या चिमटीत असतो. बिच्चारा बालाजी कुठून पीए झालो अन् कुठून नाई असं त्याला वाटत असणार”

मुषकाचे बोलणे संपत नाही तोच एक सजवलेला मोठा हत्ती, हत्तीच्या मागून 100 सजवलेले पांढरे शुभ्र घोडे, घोड्यांच्या मागून ब्यांगलोरचं लैझीम पथक, लगोलग नाशिकचं ढोल पथक, राजस्थानी कलापथक, आग्र्‍याचा के्रझी हॉपर ग्रूप, चला हवा येऊ द्या वाले, हास्य जत्राचा समीर चौगुले, महाराष्ट्राच्या तारका सोनाली, अमृता, राधा रासबिहारी हेमामालीनी, महाराष्ट्राची संस्कृती मानसी, माधुरी, लगोलग भीमगीतावाला आनंद शिंदे, अजय अतुल, अन् समोर ओवाळायला ताट घेऊल उभी असलेली नॅशनल क्रश रश्मिका मंदाना, सिनेअभिनेत्री कृती सोनन, अभिलीप्सा पांडा, सगळं काही एकसे बढकर एक… डोळे दिपवून टाकणारं, मनमोहक, नयनरम्य, अद्भूत असा समोरचा नजरा पाहून मुषकाने आपले डोळे बाप्पांच्या कानाऐवढे केले. हे सगळं डोळ्यात साठवण्याच्या पलिकडचे होऊन गेले. त्यामुळे मुषकाला जरासी भोवळ आली. सगळे जागच्या जागी थांबले. कुणी म्हणले पाणी शिंपडा, कुणी म्हणाले वारा घाला… तितक्यात गर्दीतून एक धिप्पाड देहयष्टी, पायात चप्पल नसलेला, कपाळभर आडवं चंदन फासलेला, गळ्यात, हातात रुद्राक्ष असलेला अन् तोंडात दोन चार चिंगम एकाचवेळी चावत असलेला व्यक्ती बाप्पांच्या समोर आला आणि त्यानं खाली वाकून दोन्ही कर जोडत न्रमपणे बाप्पांना नमस्कार केला. आणि दारूची अतिषबाजी करणार्‍याला हुकूम सोडला ‘बजाव…’ मग काय डावीकडून उजवीकडून नुस्त्या फुलझड्याच फुलझड्या, गुलाबी रंगाचे कागदी बार… वर बघावं तर तोफांचे रंगीत बार, सगळं आकाश व्यापून टाकलेलं. बाप्पाला आता चांगलेच चटके बसू लागले. तसेच चटके मुषकाला बसल्याने तो भोवळीतून ताड्कन बाहेर आला. मुषकाला होश आल्याचे पाहून त्या धिप्पाड माणसाने अतिषबाजी करणार्‍या माणसाला थांबण्याचा इशारा केला. त्याबरोबर तोफांचे आवाज थांबले. बाप्पानं सुटकेचा निःश्वास टाकला. इकडे त्या आतीषबाजी करणार्‍याला धिप्पाड माणसाच्यावतीने 45 लाखाची थैली इनाम म्हणून बाप्पांच्या हस्ते देण्यात आली. ‘नुस्त्या फटाक्यांवर 45 लाख’ बाप्पाच्या तोंडून आश्चर्याचे उद्गार आले. तसा मुषक पुन्हा बाप्पांच्या पुढ्यात आला अन् म्हणाला, “हे तर कैच नैत पुरा पिक्चर तो अभी बाकी है… तसे बाप्पा म्हणाले अरे हे काय स्वागत है का? एवढं जंगी स्वागत बघून माणसं मरून जायची ना? प्रेम कर बाबा पण इतकंबी नकू की या प्रेमाचे चटके बसायला लागतील”. लाजेनं चूर झालेला हा इसम मानेनच प्रतिसाद देत आदबीनं नमस्कार करीत दोन पावलं मागे सरकला. तस्सं बाप्पांनी मुषकाला ईच्चारलं “पर ह्यो गडी नेमका हाय कोण?”

मुषक म्हणाला… हा गडी कोणी मंत्री नाय पण पालकमंत्र्यांपेक्षा ह्यांची पॉवर उल्सीकबी कमी नाय… ह्यो इसम कोण आमदार नाय पण आमदारांपेक्षाही रुबाब कमी नाय… ह्यो कोणी एमबीए झालेला तरूण नाय पण मॅनेजमेंट म्हणाल तर राज्यात, देशात याच्यासारखा दुसरा कोणबी नाय. ह्यो इसम कोणी टाटा बिर्ला अंबानी नाय पण दानत म्हणाल तर कर्णापेक्षा कमी नाय. सकाळी कितीबी पैसे ह्यांच्या दारात आणून मांडा, ऊनपडूस्तोवर वाटून मोकळे… ह्यांना रिझर्व्ह बँकेचं गव्हर्नर केलं तर नोटा छापायचे कागदं संपून जातील, पण हे वाटायचे थांबायचे नाहीत. जयंती म्हणू नका, गणेशोत्सव म्हणू नका, सप्ताह, सणवार, राजकीय कार्यक्रम काहीबी असू द्या. देण्याच्या बाबतीत माणसाचा हात कोणीच धरू शकत नै. अख्ख्या जिल्हाभर देणग्या वाटणारा एकच माणूस… एकदा म्हणून कुणाला प्रेम लावलं तर कायम दादा, भैय्या म्हणून प्रेमच. पण प्रेमात गद्दारी झाली की मग तिसरा डोळा उघडून तांडवच… हिथल्या पालकमंत्र्यांची ते सावली हैत. आपला नेता मोठ्ठा व्हावा एवढाच त्येंचा ख्वाब. बारके बारके लोक प्रेमाने त्यांना आन्ना म्हणत्यात. त्यांच्या समवयस्क असलेले त्यांना वाल्मीकान्ना म्हणत्यात. पण आपुन त्यांना प्रेमानं बाल्मीकान्ना म्हणतो… आता उशीर करू नका, हत्तीवर बसा अन् चला बघू परळीकडं… अजून तर परळीत असली स्वागत बाकी हाय. पुढं त्यांचा दरबारबी बगायचाय आपल्याला…

बालाजी मारगुडे, बीड
मो. 9404350898
मुषकराज पर्व 5 वे भाग 2

मुषकराज भाग 1 वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर क्लिक करा…

Exit mobile version