Site icon कार्यारंभ लाईव्ह

विमा कंपनीच्या नियुक्तीसह शेती प्रश्न माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांनी मांडले

बीड : जिल्ह्यातील खरीप आणि रब्बी हंगाम पिकासाठी विमा कंपनीची तात्काळ नियुक्ती करा, जिल्ह्यातील शेतकर्‍यांना कापूस व तूर पिकांचा विमा मिळावा, कृषी विभागातील विविध कामांसाठी देय निधी उपलब्ध करून द्यावा आणि बीड जिल्ह्यातील 75 शेतकर्‍यांनी आत्महत्या केली, त्या शेतकरी कुटूबांना मदत करावी या विषयावर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी राज्यांचे कृषीमंत्री दादा भुसे यांची बीडमध्ये भेट घेऊन चर्चा केली. शेतकर्‍यांचे प्रश्न तातडीने सोडवावेत अशी मागणी केली आहे. कृषीमंत्री दादा भुसे यांनी मंत्रालयातील सचिवांना तात्काळ संपर्क साधून पिक विमा कंपनीच्या नियुक्ती बाबत तात्काळ निर्देश दिले आहेत.

बीड जिल्ह्यात खरीप आणि रब्बी पिकांचा विमा भरण्यासाठी कंपनीची नियुक्ती अद्याप करण्यात आली नाही त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होवू शकते. जिल्ह्यात साडे आठ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना विमा भरण्यासाठी विमा कंपनी नियुक्त करणे गरजेचे आहे जिल्ह्यातील जवळपास पाच लाख शेतकर्‍यांना अद्याप ही विमा मिळालेला नाही. विमा नाकारण्यात आला आहे. हा अन्याय होवू नये यासाठी बीड जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळात असलेल्या शेतकर्‍यांना विमा देण्यात यावा. जिल्ह्यातील कृषी विभागाअंतर्गत कांदा चाळ, शेततळे, सामुहीक शेततळे, अस्तरीकरण व ठिबकसिंचन योजनेचे शासकीय अनुदान मिळालेले नाही. हे थकीत शासकीय अनुदान उपलब्ध करून द्यावे. जिल्ह्यात गेल्या जानेवारी महिन्यापासून 75 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडतो अशा शेतकर्‍यांना व त्यांच्या कुटूंबीयाना शासनाने तातडीने मदत करणे आवश्यक आहे. या शेतकरी कुटूबीयांना घरकुल, विहीर, शेती औजारे, मुलांच्या शिक्षणासाठी मदत, अन्न पुरवठा योजनेतून धान्य पुरवठा , गॅस जोडणी व शेती पुरक व्यवसायासाठी शासनाकडून विविध योजनेतून तातडीने मदत केल्यास त्यांना अर्थिक मदत होईल. बीड जिल्ह्यात जुन अखेर 25 हजार मेट्रीक टन युरिया पुरवठा आवश्यक होता. परंतू प्रत्यक्षात 15 हजार मेट्रीक टन युरिया प्राप्त झाला आहे. तसेच डि.ए.पी. खत पुरवठा देखील कमी आला असून अनेक ठिकाणी सोयाबीनची पेरणी दुबार करावी लागली आहे. खत वाटप करत असतांना व्यापार्यांना कंपनीकडून ईतर खताचे वाटप बंधणकारक केले जात आहे. या सर्व बाबी माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चा करतांना सविस्तरपणे मांडल्या आहेत. यासर्व बाबी लक्षात घेवून कृषीमंत्र्यांनी सचिवांशी तातडीने संपर्क साधून योग्य त्या सुचना दिल्या असून जिल्ह्यात पिक विमा कंपनीची तात्काळ नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत. यावेळी शिवसेना जिल्हप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळुक, वैजिनाथ तांदळे आदी उपस्थित होते.

Exit mobile version