Site icon कार्यारंभ लाईव्ह

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 50 हजाराच्याखाली

gold

gold

प्रतिनिधी । बीड
दि.12 : सोन्यात गुंतवलेले पैसे रिकामे करण्यासाठी आणि कोरोनावर लस उपलब्ध झाल्याच्या बातमीने आता सोन्याचे दर घसरण्यास सुरुवात झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस 1,872.19 डॉलर्स या तीन आठवड्यांतील नीचांकी पातळीवर आला. भारतातही याचे पडसाद उमटले असून सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 49,955 रुपये इतका झाला आहे. बीड जिल्ह्याच्या सराफा बाजारात दुपारच्या सत्रात सोने प्रति ग्रॅम 53,600 रुपयांवर आहेत, अशी माहिती माजलगावचे निर्मळ ज्वेलर्सचे राम आबुज, आणि सराफा असोसिएशनचे माजलगाव तालुका अध्यक्ष तथा शितल ज्वेलर्सचे मालक रामराजे रांजवण यांनी दिली.
जागतिक बाजारातही सोन्याच्या दरात घसरण होत आहे. जागतिक बाजारात सोन्याचे दर 2.4 टक्क्याने घसरले असून प्रति औंस 1,900 डॉलर्सवर आले आहेत. याआधीच्या सत्रामध्ये 15 टक्क्यांनी घसरलेले चांदीचे भावही बुधवारी आणखी 2.8 टक्क्यांनी घसरले आणि प्रतिऔंस 24.11 डॉलर्स झाले आहेत. गेल्या सात वर्षात सोन्याच्या दरात एका दिवसात झालेली ही मोठी घट आहे. तसेच एका वर्षात सोन्याचे दर 25 टक्क्यांनी वाढले आहेत.
काही महिने सोन्यामध्ये असलेल्या तेजीला लगाम बसत असून सोने आंतरराष्ट्रीय बाजारात प्रति औंस 1,800 डॉलर्सच्या पातळीवर येऊ शकतं असं वृत्त तज्ज्ञांच्या हवाल्यानं रॉयटर्सनं दिलं आहे. अमेरिकी डॉलर्सच्या भावावर आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याचे भाव वर खाली होत असल्यामुळे सगळ्यांचं लक्ष डॉलरकडे लागलेलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर वधारला तर सोनं महाग होतं व डॉलर घसरला तर सोनं स्वस्त होतं. गेल्या काही महिन्यांमध्ये अमेरिकी रोख्यांच्या परताव्यामध्ये झालेल्या वाढीमुळे काही काळ डॉलरची मागणी वाढत होती, परिणामी सोनं महाग होत होतं. एका दिवसातील घसरणीचा विचार केला तर तब्बल सात वर्षात सोनं पहिल्यांदाच एकाच दिवशी इतकं घसरलं आहे. अर्थात, एका वर्षाचा विचार केला तर मात्र सोन्याचे भाव तब्बल 25 टक्क्यांनी वधारले आहेत. करोना महामारीमुळे वैश्विक मंदीच्या भीतीनं ग्रासलेल्या जागतिक गुंतवणूकदारांनी आसरा म्हणून सोन्याच्या खरेदीचा सपाटा लावला होता, परिणामी सोन्याचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात भडकले होते. येत्या काळातही आर्थिक मंदीवर उतारा म्हणून मध्यवर्ती बँका आपल्या तिजोर्‍या मोकळ्या सोडण्याची शक्यता बघता सोन्याचा भाव पुन्हा प्रति औंस 2,000 डॉलर्सकडे जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

Exit mobile version