Site icon कार्यारंभ लाईव्ह

आ.रत्नाकर गुट्टेंच्या मालमत्तेवर ईडीचा छापा

बीड दि.23 : रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या गंगाखेड शुगर आणि एनर्जी लिमिटेड या कंपनीची परभणी बीड आणि धुळे येथील तब्बल 255 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. शेतकर्‍यांच्या नावाने परस्पर कर्ज घेऊन ती रक्कम आपल्या विविध कंपन्यांमध्ये गुंतवल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ईडीने ही कारवाई केली.
गंगाखेड येथील रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांनी त्यांच्या गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी लिमिटेड या साखर कारखान्याच्या माध्यमातून अनेक शेतकर्‍यांच्या नावावर परस्पर कर्ज घेतले होते. त्या प्रकरणी ईडी कडे तक्रार केल्यानंतर ईडीने ही कारवाई केली आहे. महत्वाचे म्हणजे शेतकर्‍यांच्या नावे उचलल्या कर्जाची रक्कम त्यांनी गंगाखेड शुगर एनर्जी लिमिटेडच्या माध्यमातूनच त्यांच्या योगेश्वरी हॅचरीज, गंगाखेड सोलार पावर लिमिटेड इतर कंपन्यांमध्ये लावली ज्यांच्यावर आता ईडीने कारवाई केली आहे. काल रात्री उशिरा केलेल्या कारवाईत ईडीकडून गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेड 247 कोटी किमतींची यंत्र त्याचप्रमाणे पाच कोटी रुपयांची जमीन, योगेश्वरी हॅचरीज, गंगाखेड सोलर पावर लिमिटेडच्या परभणी बीड आणि धुळे येथील बँकांमध्ये असलेल्या सुमारे दीड कोटी रुपये किमतीच्या गुंतवणुकी आणि गंगाखेड शुगर्स लिमिटेड यांची एक कोटी दहा लाख रुपये किमतीचे समभाग इत्यादी मालमत्ता असे एकूण 255 कोटीची मालमत्ता जप्त केली असल्याचे समोर आले आहे.

Exit mobile version