Site icon कार्यारंभ लाईव्ह

माझा नेता मोदी, शहा आणि नड्डा -पंकजाताई मुंडे

pankaja munde and narendra modi

pankaja munde and narendra modi

बीड, दि. 13 : नाराज कार्यकर्त्यांसमोर आज भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी वरळी येथे आपली भुमिका जाहीर केली. माझा नेता पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा आहेत, असे पंकजा मुंडेंनी आज स्पष्ट केले. त्यामुळे आता येणार्‍या काळात पुन्हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मुंडे गटात कटशाहचे राजकारण पहायला मिळणार आहे.

कार्यकर्त्यांसमोर बोलताना पंकजाताई म्हणाल्या, माझा आतापर्यंतचा प्रवास खडतर होता, पुढेही खडतरच दिसतोय; पण अविचाराने निर्णय घ्यायचे नसतात. मला अनेकजण हे करा ते करा असे सांगत असतात. पण हा पक्ष म्हणजे माझं घर आहे. कोणी आपल्याच घरातून बाहेर जात असतं का? घराचं छत जेव्हां अंगावर पडेल तेव्हा बघू. सध्या मला हे धर्मयुध्द टाळायचं आहे या धर्मयुध्दात आपले सैनिक धारातिर्थी पडतात. त्यामुळे योग्यवेळी योग्य निर्णय घ्यायचा असतो. माझा परिवार केवळ प्रीतम मुंडे किंवा अमित नाहीत. तर हा संपूर्ण समाज माझा परिवार आहे. माझं भांडण नियतीशी आहे. कुठल्याही व्यक्तीशी अथवा पदाशी माझं भांडण नाही. दबावतंत्र वापरून कुठलं मंत्रिपद मिळवायचं हे संस्कार मुंडे साहेबांचे नाहीत. लोकांची कामं करण्यासाठी मी राजकारणात आले आहे. तुमची सगळ्यांची नाराजी मला समजू शकते. माझ्या डोळ्यात पाणी आले म्हणून तुम्ही राजीनामे दिले. पण तुमच्या डोळ्यात पाणी आले तर मी जगू शकत नाही. पक्षानं दिलेलं मी लक्षात ठेवते परंतु न दिलेलं कार्यकर्ते लक्षात ठेवतात. कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी मी बोलत असून आज मी तुमचे राजीनामे नामंजूर करीत आहेत. तुमच्या राजीनाम्यावर स्वार होऊन मला राजकारण करायचे नाही, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

Exit mobile version