Site icon कार्यारंभ लाईव्ह

शिरूर कासार तालुक्यात अवैध वाळू उपसा; नारायणवाडीत मोठा साठा

महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष; जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार

बीड : शिरूर कासार तालुक्यात महसूल प्रशासनाच्या आशिर्वादाने अवैध वाळू उपसा सुरू असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी शुक्रवारी जिल्हाधिकार्‍यांकडे दिलेल्या तक्रारीत केला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात वाळू साठ्यांवर छापेमारी आणि वाहतूक करणार्‍या गाड्या जप्त होत असतानाच शिरूर कासार तालुक्यात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे निमगांव (मा.) ग्रामपंचायत हद्दीतील नारायणवाडी गावात वाळू तस्करांनी सध्या अवैध वाळू उपसा केला आहे. शुक्रवारी (दि.26) त्याठिकाणी 150-200 ब्रास अनधिकृत वाळू साठा करण्यात आला. तो साठा जप्त करण्यात यावा आणि संबंधित अधिकार्‍यांचे सीडीआर तपासावेत. जेणेकरून माफियांशी संगनमत करणारे अधिकारी कोण? हे स्पष्ट होईल. याप्रकरणातील माफियांसह त्यांची पाठराखण करणार्‍या अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ.गणेश ढवळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. दरम्यान, नदीपात्रातील वाहनांना प्रवेश मनाई असताना देखील उपसा सुरु आहे हे स्पष्ट झाले. नारायणवाडीतील वाळू साठ्याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी आहे.

वाळू माफिया, महसूल अधिकार्‍यांचे साटेलोट
सीना नदीपात्रातील अनाधिकृत वाळू उपसा प्रकरणात अशोक कातखडे यांनी तक्रार केल्यानंतर त्याची माहिती महसूल प्रशासनातील अधिकार्‍यांमार्फत वाळुमाफियांपर्यंत पोहचली. त्यामुळे तक्रारदााच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. यावरून वाळू माफिया, महसूल अधिकार्‍यांचे साटेलोट असल्याचे स्पष्ट होते.

Exit mobile version