Site icon कार्यारंभ लाईव्ह

कारखाना बंद करू म्हणणे हा पोरखेळ वाटला का? – आ.प्रकाशदादा सोळंके

prakash solanke

prakash solanke

बालाजी मारगुडे । बीड
दि. 12 : भाई गंगाभिषण थावरे यांनी शेतकी अधिकार्‍याला केलेल्या मारहाणीने एनएसएल शुगरचे एमडी गिरीश लोखंडे यांनी थेट कारखाना बंद करण्याची धमकी दिली. या धमकीनंतर विविध स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रीया उमटत आहेत. आज दैनिक कार्यारंभने माजलगावचे लोकप्रतिनिधी आ.प्रकाशदादा सोळंके यांची भुमिका जाणून घेतली. यावेळी त्यांनी कारखान्याच्या मॅनेजमेंटबद्दल तीव्र शब्दात नापसंती व्यक्त केली.

आ.सोळंके म्हणाले शेतकर्‍यांना ऊस लागवड करायला लाऊन कारखाना बंद करतो म्हणणे हा काय पोरखेळ वाटला का? आणि एनएसएल शुगर जर तसा प्रयत्न करू पाहत असेल तर आम्ही आमच्या आधिकारात हा कारखाना ताब्यात घेऊन प्रशासकामार्फत संपूर्ण ऊस गाळप करू. त्यामुळे कुठल्याही शेतकर्‍यांनी घाबरून जाऊ नये, असे अवाहन आ.सोळंके यांनी ऊस उत्पादक शेतकर्‍यांना केले आहे. सोळंके म्हणाले, ह्यांच्या मॅनेजमेंटविषयी माझीही मोठी तक्रार आहे. कोण काय करतंय याचं कुणालाच काही मेळ नाही. सगळा कारखाना कर्मचारीच चालवतात. नोंदी खाली वर करण्याच्या कित्येक तक्रारी आहेत. प्रशासनाने बोलावलेल्या मिटींगला देखील ह्याचे मॅनेजमेंटचे अधिकारी उपस्थित नसतात. त्यामुळे इथून तिथून सगळेच जण येथील गैरप्रकाराला कारणीभूत आहेत. त्याचा फटका शेतकर्‍यांना बसतो. गिरीश लोखंडे नुसता नावाला एमडी आहे. त्याचं कारखान्यात कुणीच ऐकत नाही. अनेकदा तर त्याच्याच मागे कर्मचारी ऊसाचं टीपरू घेऊन लागतात. यावरूनच लक्षात घ्याकी इथे कसला कारभार सुरु आहे. जो दादागिरी करेल त्याचा ऊस गाळपास नेला जातो. हा काय प्रकार आहे? पैशाचा वारेमाप गोंधळ या कारखान्यात सुरु आहे. ह्याची हैद्राबादपर्यंतची सगळी साखळीच पैशात खेळत असल्याचे दिसते. हैद्राबादला बसलेल्या मालकानं कधीतरी येऊन पहावं कारखान्यात काय गोंधळ सुरु आहे. कारखान्यातील कर्मचार्‍यांनी आणि अधिकार्‍यांनी आता अतिरेक करू नये. आणि बाहेरच्यांचाही इथे अतिरेकी हस्तक्षेप वाढलाय तो बंदच व्हायला हवाय. हा अतिरेक कारखान्याला अत्यंत महाग पडू शकतो. त्यांनी वेळीच आपल्यात सुधारणा करून घ्याव्यात, असा सल्लाही आ.सोळंके यांनी कारखाना प्रशासनाला दिला आहे.

आमच्या कारखान्यात गेल्या दहा वर्षात ऊसाची नोंद खालीवर झाल्याची एक सिंगल तक्रार नाही. आमच्या कर्मचार्‍याने जरी ठरवले खालीवर करायचे तरी ते होत नाही. संबंधीत शेतकर्‍यांचा फोटो, शेताच्या चुतुःर्सिमा घेऊन त्यांची नोंद होते. जे आम्हाला जमते ते एनएसएल शुगरला का जमत नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यासंदर्भात लवकरच प्रशासकीय स्तरावर लोकप्रतिनिधी या नात्याने मिटींग घेण्यात येईल. ह्यांच्या मिस मॅनेजमेंटचा त्रास आमच्याही कारखान्याला होतो, असेही आ.सोळंके यांनी बोलून दाखवले.

गिरीश लोखंडे साहेब कारखाना
म्हणजे रसवंती नाही

गिरीश लोखंडे साहेब कारखाना उत्तमरित्या चालविण्यासाठी कंपनी तुम्हाला पगार देते. कारखाना बंद करण्याची तुम्ही सुपारी तर घेतली नाही ना? कारखाना म्हणजे रसवंती नाही की केव्हाही उठून ती बंद करावी. तुम्हाला कारखान्यातील चोर्‍या बंद करा म्हटलं तर तुम्ही कारखानाच बंद करण्याची भाषा करायला लागले. तुमच्या चोर्‍या-चपाट्या झाकण्यासाठी आमच्या शेतकरी बांधवांना कारखाना बंद करण्याची भाषा करून ब्लॅकमेल करू नका. तुमच्या धाकापायी मानसिक तणावातून एखाद्याने आत्महत्या केली तर तुमच्यावर आणि दलालांवर येईल एवढं लक्षात असू द्या. आणि असे शेतकर्‍यांवर शिरजोर होऊ नका, असे ऊस उत्पादक शेतकर्‍यांमधून बोलले जात आहे.


यावर्षी भरपूर पाऊस झाल्याने उसाचे पीक जोमात असून, सध्या गळीत हंगाम देखील तेजीत सुरू आहे. जय महेश कारखान्यावर काल झालेल्या वादाच्या अनुषंगाने पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या क्षेत्रातील पूर्ण उसाचे 100 टक्के गाळप होणे व त्यासाठी कारखाना निर्विवादपणे सुरू राहणे गरजेचे आहे, असे म्हटले आहे. आपण कारखाना प्रशासन व शेतकरी दोघांच्याही पाठीशी आहोत. कोणावरही अन्याय होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल. कारखाना प्रशासनाने ऊसतोड पूर्ववत सुरू ठेवावी.

Exit mobile version