माजलगाव, दि.12 : माजलगाव मतदारसंघाचे युवा नेते डॉ. उध्दव नाईकनवरे व अर्जुन नाईकनवरे काय निर्णय घेणार याकडे माजलगाव तालुक्याचे लक्ष लागलेले आहे. नाईकनवरे बंधूनी यांनी मागच्या पंचवार्षिकमध्ये आ. प्रकाश सोळंके यांचे काम केले होते. परंतु यावेळी ते आता आ. सोळंके यांच्यापासून चार हात दूर असल्याचे समजते. त्यातच त्यांचे बंधू अर्जून नाईकनवरे यांनी एक फेसबूक पोस्ट करीत आ. सोळंके यांना विरोध करणार असल्याचे संकेत दिले आहेत.
उध्दव व अर्जुन नाईकनवरे यांनी मागच्या पंचवार्षिमध्ये आ. प्रकाशदादा सोळंके यांच्या विजयात खारीचा वाटा उचलला होता. मात्र आमदार होताच दादांनी डॉ. उध्दव नाईकनवरे यांच्या ताब्यात असलेले माजलगाव धरणातील मासेमारीचे हक्क काढून घेत त्याचं टेंडर आपल्याच मुलाला दिले होते. नाईकनवरे यांच्यात हा राग पुर्वीपासून होता. मात्र तो कुठे मोकळा होत नव्हता. त्यात पुन्हा बंगला जळीत प्रकरणात अर्जुन नाईकनवरे यांनी आ. सोळंके यांच्याभोवती कवच उभं केलं होतं. मात्र सोळंके यांनी अर्जून यांच्याच मेहुण्याला व पुतन्याला त्यात आरोपी केले. त्यामुळे नाईकनवरे परिवार प्रचंड दुखावलेला होता. दोन दिवसांपुर्वीच नितीन नाईकनवरे यांनी मोहनदादा जगताप यांना पाठींबा जाहीर केला आहे. आता उध्दव नाईकनवरे हे काय निर्णय घेणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
अर्जून नाईकनवरे यांची ती पोस्ट चर्चेत
अर्जुन नाईकनवरे यांनी दोन दिवसांपुर्वी एक पोस्ट केली असून त्या ते म्हणातत, आपल्याला राजकीय व आर्थिक चटके देणारे काही दिवे तेच असतात ज्यांना आपण वार्यामुळे विझताना वाचवलेलं असतं. हॅशटॅग देत खाली कटू सत्य आणि माजलगाव विधानसभा असे लिहीले असल्याने ते आ. सोळंके विरोधात निर्णय घेऊन ‘हाबाडा’ देण्याची शक्यता आहे.