court

17 संशयित आरोपींना माजलगाव अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून जामीन

बीड

30/10 जाळपोळ प्रकरण ः सुंदर भोसलेच्या जामीनाकडे लागले होते सर्वांचे लक्ष

माजलगाव, दि.16 : माजलगावात घडलेल्या 30/10 च्या जाळपोळ अन् दगडफेक प्रकरणात अटक असलेल्या 17 संशयित आरोपींना माजलगावचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश भास्कर जी. धर्माधिकारी यांनी जामीन मंजूर केला आहे. यातील बहुतांश आरोपी हे 30 ते 45 दिवसांपासून जिल्हा कारागृहात आहेत.

  • माजलगाव येथे 30 ऑक्टोबर रोजी मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ सरकारच्या तिरडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चासाठी तालुक्यातील नागरिक माजलगावात आले होते. ठरल्यानुसार आंदोलन सुरू असतानाच शहरापासून बाहेर असलेल्या आ. प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यासमोर काही जमाव जमला. त्यांनी सकाळी साडेअकराच्या सुमारास बंगल्यावर तुफान दगडफेक केली. त्यानंतर काहीवेळाने संपूर्ण बंगला जाळून टाकला. पोलीस उपअधिक्षक आयपीएस पंकज कुमावत यांच्या गाडीवर दगडफेक झाली. सुंदरराव सोळंके महाविद्यालय अग्निशमन दलाची गाडी फोडण्यात आली. त्यानंतर नगर परिषद, पंचायत समितीला आग लावण्यात आली. त्यानंतर दुसर्‍या दिवशी पहाटे पोलीसांनी आ. प्रकाश सोळंके यांचा बंगला जाळल्याप्रकरणी 20 जणांवर गुन्हा नोंद केला. तर अनेकांची संशयित म्हणून नावे कोर्टात सादर करण्यात आली. फिर्यादीत सुंदर भोसले या तरूणाला देखील आरोपी करण्यात आले होते. त्याने आ. प्रकाश सोळंके यांना फोन लावून राजीनामा देण्याची मागणी केली होती. त्याने व्हायरल केलेल्या क्लिपमुळे दंगलीचा प्रकार घडल्याचे पोलीसांचे म्हणणे होते त्यामुळे त्यालाही अटक करण्यात आली. याशिवाय 38 आरोपींना आजपर्यंत अटक करण्यात आली होती. कालच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातून प्रमोद सोळंके या संशयित आरोपीला जामीन मंजूर झाला होता. याच न्याय निवाड्याचा हवाला देऊन वकीलांनी युक्तीवाद केल्यानंतर आज माजलगावच्या अतिरिक्त जिल्हा न्यायालयातून 17 जणांना जामीन मंजूर करण्यात आला. जामीन मिळालेल्यांमध्ये सुंदर भोसले सह प्रकाश आगे, माऊली आगे, संभाजी नाईकनवरे, पुरुषोत्तम आगे, अशोक जाधव, ज्ञानेश्वर कदम, प्रल्हाद चाळक, कृष्णा डहाळे, अनिकेत खामकर, शिवाजी चिरके, रोहन जोगडे, विष्णु आगे, महेश इंगवले, अकाश कारळकर, ऋषीकेश शिंदे, शैलेश अनभुले यांचा समावेश आहे. सुंदर भोसले, प्रकाश आगे, माऊली आगे यांच्या वतीने भाई अ‍ॅड.नारायण गोले पाटील यांनी युक्तीवाद केला व त्यांना अ‍ॅड.बादाडे यांनी सहकार्य केले. रोहन जोगडे, अनिकेत खामकर यांच्यावतीने अ‍ॅड. वैभव सोळंके यांनी काम पाहीले. त्यांना अ‍ॅड. विशाल थावरे, अ‍ॅड. लखन सोळंके यांनी सहकार्य केले. महेश इंगवले, आकाश कारळकर, ऋषीकेश शिंदे, कृष्णा डहाळे यांच्यावतीने अ‍ॅड. सचिन सुतळे, अ‍ॅड. नारायण तेलगड यांनी काम पाहीले. याशिवाय अ‍ॅड. टी.एन. कोल्हे, अ‍ॅड. व्ही.व्ही. फपाळ, अ‍ॅड. अतुल डाके, अ‍ॅड. एल.बी गवते, अ‍ॅड. विक्रम कदम यांनी देखील सहकार्य केले.

अ‍ॅड. गोले यांची सामाजिक
जाणीवेतून विनामुल्य सेवा

माजलगाव जाळपोळीतील आरोपींची बाजू मांडण्यासाठी अ‍ॅड. नारायण गोले यांनी सामाजिक जाणीवेतून विनामुल्य न्यायालयीन सेवा दिली. अ‍ॅड. गोले हे अनेक सामाजिक कामात अग्रेसर असतात. शेतकरी प्रश्नावर कायम ते आवाज उठवतात.