युवा शांतीवनच्या विकासासाठी आणखी निधी देऊ – धनंजय मुंडे
बीड : शहरापासून जवळच असलेल्या पाली येथील बिंदुसरा प्रकल्पाला लागून असलेल्या डोंगर परिसरात वन विभागाच्या वतीने युवा शांतीवन हा आकर्षक पर्यटन प्रकल्प साकारत आहे. या ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी चिल्ड्रेन पार्क सह विविध सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. यासाठी वनविभागाला आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
धनंजय मुंडे यांनी आ. संदीप क्षीरसागर यांच्यासह याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी तलावाच्या किनाऱ्यालगत उभारण्यात येत असलेल्या जेट्टी, रस्त्यातील ग्रीन कॅनॉपी, कॅफेटेरिया, व्हिव्युअर्स पॉईंट आदी ठिकाणी पाहणी करत ना. मुंडेंनी माहिती घेतली. ग्रीन कॅनॉपी वर विविध वेली सोडण्यात येणार आहेत. तसेच पाहणी स्थळावर सुशोभीकरण व भिंतींवर विविध प्राण्यांची चित्रे काढण्यात येत आहेत. लहान मुलांसाठी चिल्ड्रेन्स पार्क, ओपन जिम आदी कामांचीही आता पुर्णत्वाकडे वाटचाल सुरू असून, 90 टक्क्यांपेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे. कोरोनाविषयक निर्बंध हटवल्यानंतर लवकरच हा पार्क सामान्य बिडकरांसाठी खुला करण्यात येईल अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे यांनी दिली. दरम्यान, या पर्यटन स्थळी बोटिंगची व्यवस्था देखील उपलब्ध आहे, मात्र बिंदुसरा प्रकल्पातील पाणी बिडकर पिण्यासाठी वापरतात, त्यामुळे येथे बोटिंगला परवानगी नाही, अशी माहिती आ. संदीप क्षीरसागर यांनी दिली.