rajendra hoke patil

ऊस जळत होता तेव्हा शेतकरी पूत्र धारूरच्या घाटाखाली तरी उतरले का?

बीड

माजलगावात राजेंद्र होके पाटील यांचा पत्रकार परिषदेत जळजळीत सवाल

माजलगाव, दि.18 : दोन वर्षापुर्वी माजलगावात उसाचा प्रश्न गंभीर बनला होता. शेतकरी बजरंग बप्पांकडे जावून रडत होते. पण शेतकरी पूत्र म्हणवून घेणार्‍या बजरंगबप्पाला जराही पान्हा फुटला नाही. इतकंच नाही तर ह्याच बजरंग बाप्पांना माजलगावकरांनी भरभरून मतदान केलं होतं. पण हे बप्पा पाच वर्षात कधी धारूर घाटाच्या खाली देखील उतरले नाहीत. त्यामुळे बजरंग बाप्पांनी मराठा आरक्षणाच्या तव्यावर पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करू नये. बजरंग बप्पा ज्या पक्षाकडून उभे राहाणार आहेत त्या पक्षाचा ‘सगे सोयरे’ या मागणीला पाठींबा आहे का? पाठींबा नसेल तर केवळ जातीजातीत भांडण लावून मराठा समाजाची मत मागायचा बजरंगबाप्पांना काहीच अधिकार नाही, अशी टिका माजलगावचे मराठा आंदोलन राजेंद्र होके पाटील यांनी केली आहे. आम्ही मराठा आरक्षणासाठी खस्ता खाल्या, कित्येक केसेसे अंगावर घेतल्या. चार पाचशे तरूण पोरांची कुटुंब या आंदोलनात उध्दवस्त झाले आहेत. त्यांच्यासाठी मी माझी बीड लोकसभेसाठी उमेदवारी दाखल करणार आहे, अशी माहिती राजेंद्र होके पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेस रामचंद्र डोईजड, प्रा. जीवन नखाते, ओम कुरे, अशोक जगदाळे सर यांच्यासह इतरांची उपस्थिती होती. पुढे बोलताना राजेंद्र होके म्हणाले, मराठा समाज म्हणजे काही पक्ष स्वतःची मक्तेदारी समजत आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लोकसभा आली की बीड जिल्ह्यात दोन जातीत भांडणं लावून देण्याचा प्रयोग गेल्या तीन ते चार निवडणुकीत केला आहे. पण आता मराठा समाज हुशार झालेला आहे. शरद पवारांना बीड लोकसभेची जागा खरंच जिंकायची असेल तर त्यांनी बीडमधून ओबीसी उमेदवार का दिली नाही? त्यांनी ओबीसी उमेदवार द्यावा म्हणून मागच्या निवडणुकीत मी त्यांना प्रत्यक्ष भेटून मागणी केली होती. पण नाही. केवळ जाती जातीत भांडणं लावून इथे दोघांमध्ये टक्कर लावून द्यायची, विकासाच्या कुठल्याच मुद्यावर निवडणूक न लढवता त्यांनी एवढाच उद्योग जिल्ह्यात केला. त्यामुळे शरद पवार साहेबांनी मराठा समाजाला आपली मक्तेदारी समजू नये. असेही होके पाटील म्हणाले.

पवार साहेबांनी ज्या बजरंग बाप्पांनी उमेदवारी दिली त्या बजरंग बप्पाला माजलगावकरांनी लाखभर मते दिली होती. मग मागच्या पाच वर्षात माजलगावकरांच्या सुख दुःखात यायचे त्यांचे काम नव्हते का? साधे ते धारूरच्या घाटाखाली देखील उतरले नाहीत. मग का म्हणून त्यांना माजलगावकरांनी जवळ करावे? मागच्या दोन वर्षापुर्वी त्यांनी घाटाच्या खाली एक उसाचे टिपूर देखील उचलले नव्हते, मग ते शेतकरी ह्याचे सगे सोयरे नव्हते का? आज मतदानालाच बरी सगे सोयर्‍यांची आठवण झाली असाही आरोप राजेंद्र होके यांनी केला.

रेल्वेचं किती दिवस सांगणार?
आमच्या आजोबांच्या लहानपणापासून बीड जिल्ह्यात रेल्वे यायली आहे. आता आमची जायची वेळ झाली पण अजून आम्हाला रेल्वे दिसली नाही. कोण जर म्हणत असेल आम्ही रेल्वे आणली तर ह्या निव्वळ भुलथापा आहेत. प्रीतमताई मुंडेंना पावणे दोन लाख मताने जिल्ह्यातील मतदारांनी निवडून दिले. स्वतः मोदी म्हणाले होते बीडला रेल्वे आणणार. काय झाले मग? देवेंद्र फडणवीसांची भाजपा असो की शरद पवारांची राष्ट्रवादी दोन जातीत भांडण लावण्याचे काम त्यांनी बीड जिल्ह्यात केले. त्यामुळे या दोन्ही पक्षांना मत न देता तिसरा पर्याय म्हणून मी उभा राहणार आहे. रात्री बेरात्री सुखादुःखात हा राजेंद्र होके तुमच्या मदतीला येतो. त्यामुळे जो तुमच्या कामाला येतो त्याला तुम्ही मतदान करा, असे आवाहन देखील राजेंद्र होके यांनी केले.

लोकवर्गणीतून डिपॉझिट भरणार
राजेंद्र होके हा सगळ्या आठरा पगड जाती धर्माच्या लोकांच्या कायम कामाला आलेला माणूस आहे. जय महेश कारखान्याची कोट्यावधी रुपयांचे ऊस बील शेतकर्‍यांना मिळवून दिलेला हा राजेंद्र होके आहे. मराठा आरक्षण आंदोलनात सहा महिने घरदार सोडून राहावे लागले होते. माझ्यासह दोन चारशे पोरं त्यावेळी फरार होते. पण एकही नेता आमच्या घरादाराकडे फिरकला नाही. साधी विचारपूस कोणी केली नाही. आमचे दुःख आम्ही भोगले. तब्बल सहा महिन्यानंतर आमच्या जामीन झाल्या. त्यामुळे कोणता पक्ष आणि कोणताच नेता मराठा समाजाच्या फायद्याचा नाही. माझे योगदान लक्षात घेऊन माजलगावची जनता माझ्यासाठी लोकवर्गणी गोळा करून माझं डिपॉझिट भरणार आहे. कोणीही पंतप्रधान होऊ दे त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलणारा हा राजेंद्र होके पाटील आहे. आठरापगड जातीधर्मातील सर्व सामान्यांच्या विकासासाठी, मराठा आरक्षणासाठी, शेतकरी प्रश्नांसाठी, माझी उमेदवारी असणार आहे, असेही राजेंद्र होके म्हणाले.