अखेर जिल्ह्याचे ‘नियोजन’ ठरलं!

न्यूज ऑफ द डे बीड

नियोजन समितीवर सत्ताधारी पक्षांना समान स्थान
बीड : सत्ता बदल होऊन दीड वर्ष होत झाले तरी रखडलेली नियोजन समिती अखेर जाहीर करण्यात आली. या समितीतील सदस्यांचे स्थान पाहता सत्ताधारी पक्षांना समसमान वाटप करण्यात पालकमंत्री धनंजय मुंडे यांना यश आल्याचे दिसून येते.

जिल्हा नियोजन समितीवर 11 सदस्यांना स्थान देण्यात आले आहे. यात पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या शिफारशीनुसार जिल्हाधिकार्‍यांनी सुचविलेली नावे अखेर जाहीर करण्यात आली. या विधिमंडळ किंवा सदस्यांमधून नियुक्त नामनिर्देशित सदस्यांमध्ये आमदार प्रकाश सोळंके व बाळासाहेब आजबे हे असणार आहे. तसेच, जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेले नामनिर्देशित सदस्य म्हणून वाल्मिक कराड, अभयकुमार ठक्कर तर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून बाबुराव पोटभरे, शेख समशेर शेख शब्बीर, सयाजी शिंदे, विट्ठल सानप, राजेंद्र लोमटे, सुनिल वाघाळकर, महोदव धांडे, दादासाहेब मुंडे, सचिन मुळूक, अनिल जगताप, वैजनाथ सोळंके यांना स्थान मिळाले आहे. दरम्यान समितीच्या माध्यमातून विकासाला गती मिळावी व जिल्ह्याचे ‘नियोजन’ नीट व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंना डावलले
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या नावाची चर्चा नसतानाही त्यांना समितीत घेतले गेले. परंतू, आपल्यासह अन्य दोघांना समितीवर घ्यावे असे पत्र लिहून थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घालणार्‍या आणि नाव चर्चेत असलेले जिल्हाप्रमुख कुंडलिक खाडे यांना मात्र डावलण्यात आल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या खेळीमागे जयदत्त क्षीरसागर यांच्या गटाला धक्का देण्याचा प्रयत्न तर नसावा.
‘नियोजन’ची कार्यकारी समिती गठीत
बीड जिल्हा नियोजन समितीची ‘कार्यकारी समिती’ देखील जाहीर करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष हे जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे आहेत. तर नामनिर्देशित सदस्य हे आमदार प्रकाश सोळंके, वाल्मिक कराड, विशेष निमंत्रित सदस्य म्हणून आमदार संदीप क्षीरसागर, सचिन मुळूक तर सदस्यांमध्ये विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी हे असतात. तर जिल्हा नियोजन अधिकारी हे संयोजक म्हणून काम पाहतात.

Tagged