Shawarma Food Poison
मुंबई : रस्त्यावर तयार होणारा चिकन शॉर्मा खाल्ल्याने मानखुर्दमध्ये अनेकांना विषबाधा (Mankhurd Shawarma Food Poison) होऊन त्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर इतर अनेक जणांना विषबाधा (Food Poisoning) झाल्याचं समोर आलं आहे. प्रथमेश विनोद घोक्षे असे मयत तरुणाचे नाव आहे. तर इतर जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरच्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे खाद्य पदार्थ विक्री होत आहे. यातीलच आनंद कांबळे आणि मोहम्मद अहमद रेजा शेख यांच्या शॉर्मा विक्रीच्या गाडीवरून प्रथमेशसह विभागातील अनेकांनी शॉर्मा खाल्ला होता. यामुळे प्रथमेशला मोठ्या प्रमाणात उलटी आणि पोट दुखीचा त्रास होऊ लागला. त्यानंतर त्याला केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
अनेकांना विषबाधा
याच दरम्यान महाराष्ट्र नगरमध्ये याच गाडीवरुन शॉर्मा खाल्ल्याने त्रास होणाऱ्यांच्या तक्रारी येऊ लागल्या. वेगवेगळ्या ठिकाणी दहा ते बारा जणांनी उपचारासाठी धावही घेतली. मात्र आज सकाळी उपचार सुरु असताना प्रथमेशची तब्येत खालावली आणि त्याचा मृत्यू झाला. तर इतर चार जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या प्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी रस्त्यावर निकृष्ट शॉर्मा बनवून विकणाऱ्या आनंद कांबळे आणि मोहम्मद अहमद रेजा शेख या दोघांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. मुंबईच्या रस्त्यावर असे निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ मोठ्या प्रमाणात बनवून त्याची विक्री केली जाते. यावर पालिकेचे नियत्रणं राहिलेले नाही. यामुळे एक तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे.