narayan rane

हजर व्हा! नारायण राणे यांना आता नाशिक पोलीसांची नोटीस

क्राईम देश विदेश न्यूज ऑफ द डे राजकारण

नाशिक : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाड न्यायालयाकडून जामीन मिळाला असला तरी त्यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. नारायण राणेंना आता नाशिक पोलिसांकडून नोटीस आली असल्याचं वृत्त समोर येत आहे. त्यानुसार नारायण राणेंना पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एकूणच नारायण राणेंच्या समोर आता नवं संकट उभ राहिल्याचं दिसत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर राज्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नाशिक पोलीस ठाण्यातही त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच संदर्भात नाशिक पोलिसांनी नारायण राणेंना नोटीस बजावली असून 2 सप्टेंबर रोजी पोलिसांसमोर हजर राहण्यास सांगितले आहे. नाशिकमध्ये दाखल गुन्ह्याच्या संदर्भात जबाब घेण्यासाठी पोलिसांनी ही नोटीस दिली आहे.


नारायण राणेंनी केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांत राज्यातील विविध ठिकाणी जोरदार राडा झाला. नाशिक शहरात शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांत झालेल्या राड्या प्रकरणी नाशिक पोलिसांनी 100 हून अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. भाजप कार्यालय फोडणे, बेकायदेशीर गर्दी जमवल्या प्रकरणी शिवसेनेच्या नगरसेवकांसह जवळपास 30 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर शिवसेनेच्या कार्यालयावर चाल करून गेल्या प्रकरणी भाजप नगरसेवक मुकेश शहाणेसह जवळपास 100 कार्यकर्त्यांवर नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नारायण राणेंना पोलिसांनी 24 ऑगस्ट 2021 रोजी अटक केली. त्यानंतर नारायण राणेंना रत्नागिरीतील गोळवली येथून महाड येथे आणण्यात आले. रात्रीच्या सुमारास महाड न्यायालयात नारायण राणेंना हजर करण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी नारायण राणे यांची 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी सरकारी पक्षाने केली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकल्यानंतर नारायण राणेंना सशर्त जामीन मंजूर केला. नारायण राणे यांचे वकील अनिकेत निकम आणि भाऊ साळुंके यांनी युक्तीवाद केला. त्यांची प्रकृती ठीक नसल्याने तसेच त्यांचे वय लक्षात घेता त्यांना जामीन देण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने नारायण राणे यांना सशर्त जामीन मंजूर केला.

Tagged