नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याच्या आधी निवडणूक प्रचारात अदानी आणि अंबानींची एन्ट्री झालीय. यावेळी गौतम अदानी आणि अंबानींचा विषय काँग्रेस नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) नाही तर चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) काढल्यानं सर्वाच्या भुवया उंचावल्यात. तेलंगणातल्या प्रचारसभेत मोदींनी अदानी, अंबानींवरून थेट राहुल गांधी आणि काँग्रेसवरच आरोपांच्या फैरी झाडल्या. ऐन निवडणुकीत राहुल गांधी हे अदानी आणि अंबानींवर गप्प का आहेत असा सवाल करत काँग्रेसने अदानी, अंबानींकडून पैसा घेतल्याचा घणाघाती आरोप पंतप्रधानांनी केला.
या आधी राहुल गांधींची अदानी-अंबानींवर टीका
याआधी राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार केवळ अदानी, अंबानींसाठीच काम करत असल्याचा आरोप सातत्यानं केला आहे. अदानींच्या यशाचं रहस्य काय आणि मोदींचं त्यांच्याशी नेमकं नातं काय असा थेट सवाल राहुल गांधींनी भर संसदेत केला होता. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच अदानी आणि अंबानी यांच्यावरून राहुल गांधींना सवाल केला आहे.
नरेंद्र मोदींचा सवाल
पण राहुल गांधींच्या यापैकी कोणत्याच आरोपांना मोदींनी कधीच थेट उत्तर दिलं नव्हतं. राहुल गांधींच्या आरोपांनंतरही मोदींनी संसदेत अनेकदा भाषण केलं, पण त्यात अदानींचा साधा उल्लेखदेखील केला नाही.या मुद्द्यांवर आतापर्यंत गप्प असणाऱ्या मोदींनी ऐन निवडणुकीत स्वत:च अदानी, अंबानींचं नाव घेत राहुल गांधींवरच आरोप केलाय. त्यासाठी निवडणुकीचे तीन टप्पे संपल्यानंतर चौथ्या टप्प्याचा मुहूर्त मोदींना का शोधून काढला हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.