नायब तहसीलदारांच्या बदलीसाठी जिल्हाधिकार्‍यांच्या नावे बोंबा मारो

केज न्यूज ऑफ द डे बीड

केज : येथील तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार सचिन देशपांडे यांच्या बदलीच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या नावे शेकाप, शिवसंग्राम, रिपाई हे तीन पक्ष केज तहसील कार्यालयासमोर (दि.24) रोजी सकाळी 11 वाजता बोंबा मारो आंदोलन करणार आहेत.

येथील तहसील कार्यालयात कार्यरत नायब तहसीलदार सचिन देशपांडे यांच्या एकूण 27 वर्षांच्या सेवेपैकी तब्बल 23 वर्षे केज तहसील कार्यालयात आहेत. त्यांनी याठिकाणी लिपीक, अव्वक कारकून, नायब तहसीलदार या पदांसह विविध विभागांचे काम पाहिले आहे. ते केज येथील रहिवासी असल्यामुळे विशिष्ट पक्षांच्या कार्यकर्त्यांची कामे करतात. त्यांच्याकडून पक्षपातीपणा होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्याकडे वारंवार तक्रारी, निवेदने देऊनही त्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे आता थेट जिल्हाधिकार्‍यांच्याच नावे बोंबा मारो आंदोलन करणार आहोत, असे शेकापचे माजी जिल्हा चिटणीस भाई मोहन गुंड, शिवसंग्रामचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब गलांडे, रिपाईचे तालुकाध्यक्ष दिपक कांबळे यांनी पत्रकात म्हटले आहे.

Tagged