Site icon कार्यारंभ लाईव्ह

ऑनलाईन शिक्षण अन् मोबाईलचे जडले व्यसन

बीड : शिक्षण क्षेत्रात सध्या सुरू असलेल्या ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात मोबाइलचं व्यसन जडल्याचे दिसून येत आहे. हे विद्यार्थ्यांसाठी धोकादायक आहे अशा शब्दात शिक्षणप्रेमी एस.एम.युसूफ यांनी चिंता व्यक्त केली आहे.

युसूफ म्हणाले, 15 जूनपासून शाळा प्रत्यक्षात सुरू न करता शासनाने मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला शासनाच्या या निर्णयाचे अनेकांनी कौतूक केले. ते यासाठी की शाळा बंद ठेवून विद्यार्थ्यांना शिक्षणाविना ठेवण्याऐवजी ऑनलाईन का होईना, शिक्षण तरी मिळेल. परंतू पहिल्या तिमाहीतच या ऑनलाईन शिक्षणाचे विद्यार्थ्यांवर होणारे विपरित परिणाम मोठ्या प्रमाणात समोर येऊ लागले आहेत. तसे शासनाने सर्वे केलेल्या यंत्रणेकडून अहवाल आलेला आहे की, ऑनलाइन शिक्षण जेमतेम 40 टक्के विद्यार्थी घेत आहेत. 60 टक्के विद्यार्थी अजूनही ऑनलाइन शिक्षणापासून वंचित आहेत. अशा स्थितीत जेव्हा हे शैक्षणिक वर्ष संपत येईल तेव्हा एकूण एक विद्यार्थ्यांची परीक्षा नेमकी कशी घेतली जाईल? हे माय-बाप शासनच ठरवेल. हा विषय पुढे चालून समोर येणारच आहे. मात्र तूर्तास तरी ऑनलाईन शिक्षण घेणार्‍या 40 टक्के विद्यार्थ्यांमधून काही विद्यार्थी हे पालकांच्या मोबाईलवरून ऑनलाईन शिक्षण घेत आहेत तर सधन परिस्थिती असलेल्या पालकांनी पाल्याच्या ऑनलाईन शिक्षणाचा आपल्याला व आपल्या मोबाईलला ताप नको म्हणून आपापल्या पाल्यांना स्वतंत्र मोबाईल घेऊन दिले आहेत. अशाप्रकारे स्वतंत्र मोबाईल मिळालेले विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण संपल्यावरही सततपणे मोबाईल हातात ठेवून त्यावर नको ते कुटाणे करत बसल्याचे आढळून येत आहे. थोडक्यात ऑनलाईन शिक्षणाचा अभ्यास कमी आणि इतर वायफळ प्रकार जास्त होत आहेत. अति मोबाईल वापरामुळे आरोग्य स्वास्थ्यावर होणार्‍या परिणामांबाबत पालकांनी केलेल्या सूचनांकडे सुद्धा दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांना डोळ्यांचे त्रास, डोकेदुखी, झोप कमी, निद्रानाश अशा रोगांना निमंत्रण मिळणार आहे. भविष्यात ऑनलाईन शिक्षणामुळे लागलेल्या मोबाईलच्या व्यसनातून विद्यार्थ्यांना मुक्त करण्यासाठी मोबाईल व्यसनमुक्ती केंद्र निर्माण करावे लागतील, अशी भीती शिक्षणप्रेमी एस.एम.युसूफ यांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version