घरात नाही दाणा अन् पोरगं म्हणतं टॅब आणा!

करिअर बीड मराठवाडा महाराष्ट्र

ऑडिओ कॉलला रेंज नाही अन् शाळा म्हणतात ऑनलाईन शिक्षण घ्या! इंग्लीश स्कूलकडून फी वसूलीसाठी ऑनलाईनचं गाजर

प्रतिनिधी । बीड
दि.10 : कोरोनाने भल्याभल्यांना वठणीवर आणलं मात्र इंग्लिश स्कुलवाले काही सरळ होताना दिसत नाहीत. मागच्या वर्षी परिक्षा झालेली नाही, मुले तीन महिने शाळेत देखील गेलेली नाहीत. तरीही इंग्लिश स्कूलवाल्यांनी पालकांकडे मागच्यावर्षीची फिस भरा, असा तगादा लावला आहे. फिस भरली तरच तुमच्या पाल्यांना ऑनलाईन शिकवले जाईल, अन्यथा तुमचा पाल्य अभ्यासात मागे पडेल, अशी भिती दाखवून शाळेमार्फत मेसेज पाठवले जात आहेत. ऑनलाईन शिक्षणाचं गाजर दाखवून शाळा मागच्यावर्षीची फिस वसुली करण्यात गुंतल्या आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना टॅब घ्यायला लावून तात्पुरता नादी लावण्याचा प्रकार होत आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीसमोर पालक हतबल झाले असून ‘घरात नाही दाणा अन् पोरगं म्हणतं टॅब आणा’, अशी गत घराघरात झालेली आहे.
कोरोनाने अख्ख जग थांबलं आहे. परराज्यातून, परदेशातून मुलं घरची वाट धरत आहेत. इंजिनिअरिंग सारख्या उच्च शिक्षणाच्या परीक्षा देखील रद्द केल्या आहेत. हे संकट इतकं भयानक आहेच म्हणून तर हा निर्णय सरकारने शाळा बंदचा निर्णय घेतला. मग लहान लहान मुलांच्या शिक्षणाबाबतीत शाळा इतकी घाई का करीत आहेत? शाळा 15 ऑगस्ट नंतर सुरु होतील, तोपर्यंत ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय पुढे ठेवला आहे. ऊस तोडायला जाणार्‍या मजुराच्या पोराला कुठून ऑनलाईन शिक्षण मिळणार हा साधा विचार सुद्धा मनात आला तरी शिक्षणाच्या आणि आपल्या संवेदनशीलतेचा काहीही संबंध राहिलेला नाही असंच लक्षात येतं. बरं पालक मुलांच्या भवितव्यासाठी पोटाला चिमटा घेऊन टॅब खरेदीही करून देतील. पण त्यासाठी लागणार्‍या तांत्रिक सपोर्टचं काय?

इथे एका मिनिटाचा ऑडिओ कॉलला हॅलो हॅलो करीत घराबाहेर यावं लागतं. तोही दहादा डिस्कनेक्ट होतो. तिथे तासभर मुलांना ऑनलाईनसाठी नेट कनेक्टीव्हीटी मिळेल का? याचं उत्तर एकाही इंग्रजी शाळांकडे नाही. शहरी भागात ‘फोरजी’ची स्पीड सांगितली जात असलं तरी ‘टूजी’ची देखील स्पीड मिळत नाही. शहरी भागाचे हे हाल असतील तर ग्रामीण भागातील काय परिस्थिती असेल याचा विचारही न केलेला बरा. आधीच लॉकडाऊनमुळे अनेकांना नोकरी गमवावी लागली आहे. कुणाला पगार कपातीला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे घरातील खर्च भागवता भागवता पालकांच्या नाकी नऊ आले आहेत. आर्थिक, मानसिक आणि सामाजिक संकटात पिचलेला पालक त्याने नेमकं काय करायचं? घरभाडे द्यायचं की किराणा आणून घरातल्यांचं पोट भरायचं? की मुलांना ऑनलाईसाठीचं साहित्य खरेदी करून द्यायचं? असे अनेक प्रश्न त्याच्यासमोर आहेत.

छोट्या मुलांना काय कळणार?
अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना टॅब दिले आहेत. मात्र पाल्य त्याचा वापर शिक्षणाऐवजी गेम, व्हिडिओ, टिकटॉकसाठी करीत आहेत. एरव्हीच घरातले इतर अ‍ॅन्डॉईड मोबाईल पाल्यांच्या हातातून हिसकावून घ्यावे लागतात. तिथे आता त्यांना टॅबच दिला असेल तर ते खरंच शिक्षण घेतील का? शिक्षण आणि करमणूक यातील फरकही समजण्या इतपत त्यांचं वय नसेल तर ऑनलाईन शिक्षणाची संकल्पना फेल जाणार हे निश्चित.

सरकारने काय करणे अपेक्षित?
1. इतर पर्याय जसं की उशिरा शैक्षणिक वर्ष सुरु करणं, पुढील उन्हाळी आणि दिवाळी सुट्टी रद्द करता येऊ शकते.
2. जसं मुख्यमंत्र्यांनी घरमालक किंवा मालकांना विनंती करून घरभाडे माफ किंवा पुढे ढकलावे अशी विनंती केली, कर्जाचे हफ्ते पुढे ढकलले तसेच शाळेची फीस ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत माफ करावी.

हा फिस वसुलीचा नवा पॅटर्न – दीपक नागरगोजे
ऑनलाईन शिक्षण ही केवळ मलमपट्टी आहे. आपली पारंपरिक शिक्षण पद्धतीच योग्य आहे. शिक्षक तरी ऑनलाईन राहून मुलांवर कसा कंट्रोल ठेवणार? हा फीस वसूल करण्याचा नवा पॅटर्न आता शिक्षण संस्थांनी आणि सरकारने शोधून काढला आहे. इतकी का शाळांना घाई की शाळा थांबायला तयारच नाहीत? मोठे मोठे शिक्षण सम्राट या शिक्षण संस्थांत असतात आणि आता तर शाळेचं कुठलाच सामान किंवा साधनं मुलं वापरणार नाहीत मग फीसची सक्ती का? शासनानेच फीस माफीचा निर्णय घ्यावा’ असे मत शांतीवन प्रकल्पाचे दीपक नागरगोजे यांनी व्यक्त केले.

ऑनलाईनचा खेळ थांबवून शाळा उशीरा सुरु करा -मनोज जाधव
ऑनलाईन शिक्षणाचे धडे देताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व पालकांना मोठा आर्थिक व टेक्निकली सामना करावा लागत आहे. शेतकरी, शेतमजूर, ऊस तोडणी कामगार, वस्ती शाळेवरील मुले यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना हे ऑनलाईन शिक्षण परवडणारे नाही. त्यामुळे ऑनलाईन ऐवजी शाळा सुरू झाल्यावर सुट्टीत जास्त वेळ शाळा घेऊन त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून घ्यावा, अशी मागणी शिक्षण हक्कासाठी झगडणारे सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव यांनी केली आहे.

शाळाच बंद होत्या, फिस कुठून भरायची?
एका पालकाने नाव न सांगण्याची अट घालून सांगितले की माझी मुलगी दहावीत शिकते. तिला 30,000 एवढी फीस आहे. त्या फीसचा एक हफ्ता आम्ही भरला आहे. आता मार्चपासून शाळा बंद आहे. आम्हाला फीस भरा अशा आशयाचे मेसेजेस शाळेतून येत आहेत. आता लॉक डाउनमध्ये सगळ्याच अडचणी आहेत, शाळाच बंद होती परिक्षा देखील झालेल्या नाहीत तर आधी भरलेली फीस पण आणि आता भरावी लागणारी फीस अशी दुप्पट समस्या आहे.

Tagged