मसरतनगरमुळे बीडची कसरत

बीड

बीड : मसरतनगर मधील एका प्रतिष्ठीत कुटुंबामुळे बीडकरांवर कसरतीची वेळ आली आहे. या कुटुंबाला हैद्राबादला ने-आण केलेला चालक पहिल्यांदा पॉझिटीव्ह आला. त्यानंतर कुटुंबातील तिघांना क्वारंटाईन होण्याचे आदेश असतानाही ते भणभण फिरत राहीले. त्यांनी एक नव्हे दोन लग्नाला हजेरी लावली. त्यानंतर त्याच कुटुंबातील तीनजण पॉझिटीव्ह आढळून आले. त्यानंतरही कुटुंबातील सदस्य बँकेत गेले, रजिस्ट्री ऑफिसमध्ये गेले. आता त्यातील दोघे पुन्हा पॉझिटीव्ह आढळून आले. आज दुपारी पॉझिटीव्हची बातमी बीडमध्ये येऊन धडकताच बँकेने तातडीने लाऊडस्पीकवरून व्यवहार बंद करत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे बँकेत आलेल्या ग्राहकांचाही काही काळ गोंधळ उडाला.

बीडमधील मसरत नगरच्या या कुटुंबातील पॉझिटीव्ह आलेले रुग्ण  क्वारंटाईल असताना एसबीआयच्या मुख्य शाखेत जाऊन आला. तेथील पाच कर्मचार्‍यांशी ते अगदी जवळून संपर्कात होते. या कर्मचार्‍यांना घेऊन ते मॉडगेज करण्यासाठी बीडच्या रजिस्ट्री कार्यालयात जाऊन आले. तत्पुर्वी बराच काळ ते बीडच्या काही मुंद्राक विक्रेत्यांना देखील भेटल्याची चर्चा आहे. आज हे दोघे पॉझिटीव्ह आल्यानंतर रजिस्ट्री ऑफिसही तातडीने बंद करण्यात आले आहे. आता याकाळात बँकेत कितीजण आले. मुद्रांक विक्रेत्यांकडे कोण कोण गेले? रजिस्ट्री ऑफिसमध्ये कोण कोण गेले. या सगळ्या भानगडी उकरून काढताना आरोग्य विभागासोबतच बीडकरांना कितीतरी कसरत करावी लागणार आहे.

सोमवारपर्यंत बँक बंद?

दरम्यान एसबीआय बँक कंटेनमेंट झोनला चिटकून आहे. परंतु ती बंद करण्यात आलेली नव्हती. एसबीआयच्या वरीष्ठ अधिकार्‍यांनी बँकेला भेट दिल्यानंतर आता बँक सोमवारपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याचे समजते. परंतु बँकेतील कुणाही जबाबदार अधिकार्‍यांनी याला दुजोरा दिलेला नाही. अग्रणी बँकेलाही यासंबंधी काही माहिती नव्हते. मात्र असे असले तरी आता बँकेतील कर्मचारी भयभीत झालेले आहेत. नाव न सांगण्याच्या अटीवर काहींनी सांगितले की पुढील पंधरा दिवसांसाठी बँक बंद ठेवायला हवी. बँकेत अनेकजण व्यवहारानिमित्त येतात-जातात. त्यामुळे धोका कित्येक पटीने वाढलेला आहे. त्यासाठी बँक बंद ठेवणेच सर्वांसाठी चांगले असेल, असेही एका अधिकार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

रजिस्ट्री ऑफिसला जिल्हाधिकार्‍यांकडून सुचना नाहीत
दरम्यान रजिस्ट्री ऑफिसही तातडीने बंद करण्यात आले आहे. याबाबत  जिल्हा प्रशासनातील अधिकार्‍यांची आणि आरोग्य अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता आमच्याकडून तशा अद्याप सुचना नाहीत. परंतु पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात ज्या कुणाचा संपर्क आलेला असेल त्यांनी स्वतःहून क्वारंटाईन होणं गरजेचं आहे. त्यांच्यात लक्षणं दिसून आल्यास तातडीने त्यांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. 

कोरोना पॉझिटीव्ह कुठे कुठे फिरले, कालावधी जाहीर करा
मसरत नगरमध्ये आढळलेले रुग्ण कुठल्या तारखेला किती वाजता कुठे कुठे जाऊन आले याची अधिकृत माहिती जिल्हा प्रशासनाने जाहीर करण्याची मागणी होत आहे. बँकेत गेलेेले नागरिक, रजिस्ट्री ऑफिस, मुद्रांक विके्रेते आदी सगळेच सध्या चिंतेत आहेत. 

धारूरचा कंटेनमेंट झोन हटवला
धारूर शहरातील दुधीया कॉलनीत आढळेल्या एका रुग्णामुळे हा भाग कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आला होता. आता येथील सर्व निर्बंध हटविण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.

Tagged