शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांची हकालपट्टी!

न्यूज ऑफ द डे बीड माजलगाव


धोंडूदादा पाटलांचे संपर्कप्रमुख पद काढले ; नवे जिल्हाप्रमुख कोण? याकडे सर्वांचे लक्ष
बीड दि.19 : शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव आणि उपजिल्हा प्रमुख गणेश वरेकर यांच्यातील मारहाणीवर शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी गुरुवारी रात्री व्हिडिओद्वारे आपली भुमिका मांडली. यात त्यांनी ‘शिवसेना नेत्या सुषमा अंधारे या जो पैसे देईल त्यांना पद वाटत सुटल्या होत्या. माझं पद देखील त्या विकायला निघाल्या आहेत. आम्ही इथे जिल्हाप्रमुख आहोत. त्यामुळे आम्हाला विचारात घेऊन पद द्या असे मी त्यांना सांगत होतो. त्यावेळी गणेश वरेकर आणि माझ्यात बाचाबाची झाली. यात मी सुषमा अंधारे यांना देखील एक कानाखाली ठेवून दिली. असे सांगितले. त्यांनतर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी तडकाफडकी अप्पासाहेब जाधव यांची पक्षातून हकालपट्टी केली. तर संपर्कप्रमुख धोंडूदादा पाटील यांनाही पदावरून कमी केले आहे. अशी माहिती ‘सामना’तून दिली आहे.

दरम्यान व्हायरल केलेल्या व्हिडिओत शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव म्हणाले गेल्या अनेक दिवसांपासून सुषमा अंधारे येथील कार्यकर्त्यांना ब्लॅकमेल करून विविध वस्तु मागत आहेत. त्यांच्या परळीतील कार्यालयासाठी अनेक कार्यकर्त्यांनी लेकरा बाळाच्या तोंडातला घास काढून त्यांना विविध वस्तु दिल्या. आम्ही काही देण्यास नकार दिला की आमचं निगेटीव्ह वार्तांकन उध्दव साहेबांकडे करीत होत्या. या संदर्भात मी स्वतः उध्दव साहेबांना थेट बोललो. त्यांच्या अशा वागणुकीच्या तक्रारी देखील केल्या. मात्र तरीही अंधारे यांचा हा प्रकार सुरूच होता. आज सभा स्टेजची पाहणी करण्यासाठी आम्ही जेव्हा गेलो त्यावेळी अंधारे यांना मी बाजूला घेऊन या प्रकाराबद्दल जाब विचारला. त्यांना मी म्हणालो तुम्ही असे पैसे घेऊन किंमत नसलेल्या कार्यकर्त्यांना का पदे वाट आहात? त्यावरून त्यांची आणि माझी बाचाबाची झाली. त्यामुळे रागाच्या भरात मी त्यांच्या कानाखाली ठेऊन दिली. असेही ते म्हणाले. त्यांनतर शुक्रवारी (19) सामनातून अप्पासाहेब जाधव यांची जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी तर संपर्क प्रमुख धोंडूदादा पाटील यांना पदावरून कमी केल्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे आता नवीन जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुख कोण होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Tagged