बीड दि.29 : देशात, राज्यात मोठी घटना घडली की, त्यामध्ये बीडचे काही ना काही कनेक्शन नक्की समोर येते. उत्तर प्रदेशातील बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणाचं बीड कनेक्शन आता समोर आलेलं आहे. धर्मांतर प्रकरणी अटकेत असलेला इरफान शेख बीड जिल्ह्यातील सिरसाळा येथील असल्याचं समजत आहे. याप्रकरणी इरफान शेखसह इतर आरोपींना दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. या घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
धर्मांतर करणार्या या मोठ्या रॅकेटमधील मुफ्ती काझी जहांगीर कासमी आणि मोहम्मद उमर गौतम या दोघांना अटक केली होती. राष्ट्रीय स्तरावर सुरु असलेल्या धर्मांतर रॅकेटचा ते भाग असल्याचं उत्तर प्रदेश पोलिसांनी म्हटलं होतं. त्यापाठोपाठ आता या प्रकरणी केंद्र सरकारच्या बाल कल्याण मंत्रालयात काम करणार्या इरफान शेखलाही अटक करण्यात आली आहे. पोलीस चौकशीत हा तरुण मूळचा बीड जिल्ह्यातील सिरसाळा येथील असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेरोजगार, गरीब कुटुंब आणि मूक बधिर लोकांचे धर्मांतरण करण्यात येत होते. याप्रकरणी यूपी एटीएसने दोन आरोपींना दिल्लीतून अटक केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या लोकांना लाच देऊन त्यांचे धर्मांतरण करण्यात येत होते. धक्कादायक बाब म्हणजे, या धर्मांतरणासाठी आयएसआय फंडिंगचे प्रकरणही समोर आले आहे. इरफान हा सध्या दिल्ली या ठिकाणी वास्तव्यास होता. तो दिल्लीमध्ये केंद्र सरकारच्या बाल कल्याण मंत्रालयामध्ये इंटरप्रीटेटर म्हणून काम करतो. मात्र इरफानला अवैध धर्मांतर प्रकरणांमध्ये युपी एटीएसनं ताब्यात घेतलेलं आहे. तसेच अहमदाबाद येथील आयोजित विद्यालयाच्या कार्यक्रमास भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. यावेळी सिरसाळा गावचा भूमी पूत्र माझा लहान भाऊ प्राध्यापक इरफान खाजा खान पठान यांचे उत्कृष्ट कार्याबद्दल व्यासपिठावर स्वतः नरेंद्र मोदी यांनी कौतूक केलं होतं. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे इरफान असं करू शकत नाही, असं त्याच्या मामांना वाटत असून संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन त्यानंतरच या प्रकरणी बोलू असं त्यांनी सांगितलं आहे.