majalgaon

बीड जिल्ह्यात 24 तासापासून प्रचंड पाऊस

न्यूज ऑफ द डे बीड

प्रतिनिधी । बीड
दि. 7 : बीड जिल्ह्यात सहा सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजल्यापासून सुरु झालेला पाऊस 24 तास उलटले तरी थांबायचे नाव घेत नाही. प्रत्येक तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरु आहे. कुठे मुसळधार बरसतोय तर कुठे त्याची संततधार सुरु आहे. जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये पावसाचे प्रचंड पाणी साचले आहे. पिकांमध्ये देखील पाणी साचून आतोनात नुकसान झाले आहे. काही ठिकाणचे छोटे मोठे तलाव फुटून शेतकर्‍यांच्या जमीनी वाहून गेल्या आहेत. प्रत्येक ठिकाणाहून केवळ नुकसानीच्याच बातम्या हाती येत आहेत.


शिरूर तालुक्यातून वाहणारी सिंदफना नदी तुडुंब भरून वाहत आहे. तालुक्यात सतत पाऊस सुरुच आहे. छोटे मोठे नदी नाले सिंदफणाला येऊन मिळत असल्याने ही नदी दुथडी भरून वाहत आहे. या भागात उडीद, तूर आणि सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
बीडच्या बिंदुसरेचं देखील हेच चित्र आहे. बिंदुसरा प्रकल्पासह, डोकेवाडा, करचुंडी, खटकळी तलाव ओसंडून वाहत आहेत. बिंदुसरा तलावाच्या मोठ्या चादरीवरून आता पाणी वाहू लागले आहे. कपिलधारच्या धबधब्याची धार देखील मोठी झालेली आहे.


धारूर तालुक्यातील आरणवाडी प्रकल्पाची पिचिंग खचल्याने प्रकल्प फुटण्याचा धोका आहे. त्यामुळे सांडवा फोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याने हे पाणी देखील कुंडलिका नदीमार्फत माजलगाव प्रकल्पात येऊन मिळणार आहे. त्यामुळे धरणात 7 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता 97 हजार 306 क्युसेकची आवक सुरु होती. येथील प्रकल्पाच्या 11 दरवाजांमार्फत तेवढेच पाणी नदीपात्रात सोडण्यात येत होते. त्यामुळे माजलगाव प्रकल्पाखालील सिंदफणा पात्रात पूरसदृश्य परिस्थिती असून छोट्या मोठ्या ओढ्यांमुळे रोशनपुरी, सांडसचिंचोली या गावांचा संपर्क सध्याच तुटलेला आहे.


परळी-अंबाजोगाई या भागात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु आहे. कन्हेरवाडीजवळील पर्यायी पूल वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. अंबाजोगाई शहरात देखील सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. शेतातील सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.
आष्टी तालुक्यातील काही गावात तर प्रचंड पाऊस झालेला आहे. एकाच रात्रीतून बेलगाव, निंबोडी, करंजी, कर्‍हेवडगाव, ब्रम्हगाव, देवीनिमगाव, रुटी इमनगाव, बेलगाव, कांबळी, गहूखेल, उदखेल, बावी, चोभानिमगाव हे सर्व तलाव ओव्हरफ्लो झालेले आहेत. या भागात सततच्या पावसाने कांदा आणि तुरीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे.


बीड जिल्ह्यात सर्वात जास्त पाऊस वडवणी तालुक्यात कोसळत आहे. कालपासून तालुक्यात प्रचंड पाऊस होत असून छोटे मोठे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. उर्ध्व कंडलिका प्रकल्पही तुडुंब भरून वाहत आहे. त्यामुळे शेतीचे आतोनात नुकसान झाले आहे. तालुक्यातील सुमारे 25 गावांचा संपर्क तुटलेला आहे. वडवणी आणि धारूर हा मार्ग देखील बंद करण्यात आलेला आहे.


माजलगाव तालुक्यातही प्रचंड पाऊस सुरु आहे. सर्वच पिकांमध्ये पाणी शिरल्याने शेतीचे आतोनात नुकसान झाले आहे. कापूस, तूर, सोयाबीन आणि ऊसाचे देखील नुकसान झाल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. माजलगाव शहरात मुख्य रस्त्यासह अनेक भागात पाणी भरल्याने व्यापार्‍यांच्या दुकानात पाणी शिरले आहे. सिंदफना नदीवरील जुना पूल पाण्याखाली गेला आहे. तालुक्यातील पात्रुड ते सिमरी पारगाव या दरम्यानच्या पर्यायी पुल वाहून गेल्याने हा रस्ता देखील बंद झाला आहे. जुन्या माजलगावातील स्मशानभुमीत सध्या पाणी शिरले आहे. त्यामुळे जुने शहर सध्या धोक्याच्या पातळीत आहे.


गेवराई तालुक्यातील अनेक गावांना आता पाण्याचा वेढा बसण्याची
गेवराई तालुक्यातील अनेक गावांना आता पाण्याचा वेढा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कमी अधिक पाऊस होत असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. राजापूर, राहेरी, भोगलगाव या तिन्ही गावांची परिस्थिती बिकट आहे. गोदावरी नदीदेखील दुथडी भरून वाहत आहे. कोल्हेर, रेवकी, देवकी, परिसरातील शेतकऱ्यांच्या तर उभ्या उसाचा सुपडा साफ झाला आहे. उमापूर – मालेगाव रस्त्यावरच्या पूलाचा अर्धा भाग वाहून गेला आहे. बंगाली पिंपळा, शेकटा येथील पाझर तलाव फुटले, खोपटी तांडा तलावाला भगदाड पडले आहे. काही तलावांना तडे गेले आहेत. त्यामुळे, वाढत्या पावसाने धोका आणि अडचणीत वाढ होईल की काय, अशी शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

माजलगावातील अनेक दुकानात पाणी शिरल्याने सामाजिक कार्यकर्ते मनोज फरके यांनी पाण्यात बसून भर पावसात आंदोलन केले.
Tagged