RAMDAS ATHWALE, AMBAJOGAI

मराठा समाजाला देखील एससीएसटी प्रमाणे केंद्राचे वाढीव आरक्षण देऊ -रामदास आठवले

बीड

अंबाजोगाई, दि.7 : एससी, एसटीला ज्याप्रमाणे आरक्षण मिळते त्या प्रमाणे मराठा समाजाला देखील आरक्षण मिळावं, अशी आमची मागणी आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आमचा देखील पाठींबा आहे. राज्यात एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले आहे. आमच्या समाज कल्याण मंत्रालयाकडे राज्याकडून प्रस्ताव आल्यास आम्ही देखील केंद्रात मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देवू, असे अश्वासन केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले RAMDAS ATHAWALE यांनी दिले.ते अंबाजोगाईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अंबाजोगाईत आयोजित सभेत बोलत होते.

पुढे बोलताना मंत्री रामदास आठवले म्हणाले, माझ्या दलित बांधवांना मी सांगू इच्छितो या देशाचे संविधान कोणी बदलणार नाही. जर कोणी बदलण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या पाठीमध्ये मी लाथ घातल्याशिवाय राहणार नाही. ज्यांनी संविधान बदलण्याचे काम केले तेच आज म्हणतात की हे देशाचे संविधान बदलणार आहेत. मात्र त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका, असे आठवले म्हणाले. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक मोदी साहेबांनी बनवले. मुंबईतील इंदू मिलच्या जागेत स्मारक बनविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सरकारने त्यासाठी साडेतीन हजार कोटी रुपयांचे बजेट दिले आहे. तरीही म्हणतात मोदी संविधान बदलणार आहे, असे कधीच होणार नाही, असेही आठवले म्हणाले.

आमचा आरक्षणाला पाठींबा आहे. राहूल गांधी सांगत आहेत की आम्ही संपूर्ण आरक्षण काढून घेणार पण ते चुकीच्या पध्दतीने गैरसमज करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांची तक्रार मी निवडणूक आयोगाकडे केली असून त्यांच्या भाषणावर बंदी आणावी, अशी मागणी मी करीत आहे. 10 टक्के जे आरक्षण दिले आहे त्यात मुस्लिम समाजाला देखील फायदा आहे. पण काँग्रेसवाले मुस्लिम समाजाला भिती दाखवतात. एकनाथ शिंदे गावोगाव फिरून राजकारण करतात. पण काहीजण घरात बसून राजकारण करतात. त्यांना आता जनता घरात बसवणार आहे अशी टिका रामदास आठवले यांनी उध्दव ठाकरेंवर केली.
मातंग, चर्मकार, बौध्द समाज हा भाजपच्याच उमेदवाराला मतदान करणार आहेत. मतदानाची तारीख आहे तेरा अन् तुतारीची वाजवा तुम्ही बारा, असेही रामदास आठवले म्हणाले.

मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात भारतीय जनता पार्टींचा मोठा वाटा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा काढा आता काटा. अशी कोटीही त्यांनी यावेळी केली.

ते चंदन तस्कर कोण हे शोधा
जिल्ह्यात चंदनाची तस्करी केली जाते. ते चंदन तस्कर कोण आहेत ते मुख्यमंत्री साहेबांनी शोधून काढावे. त्यांना शोधून काढा अन् लगेच गाढून टाका, अशी मागणीही केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली.

Tagged