NARENDRA MODI IN AMBAJOGAI

गोपीनाथ मुंडेंनी बीडच्या विकासाची जबाबदारी पंकजांवर सोपवली आहे – नरेंद्र मोदी

बीड

अंबाजोगाई, दि.7 : येणार्‍या 13 मे रोजी देशाच्या विकासाचे महापर्व आहे. भाजपा आणि एनडीएने गोपीनाथ मुंडेच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मुलगी पंकजांवर ही जबाबदारी सोपवली आहे. त्यांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करा. मतदानाचे सगळे जुने रेकॉर्ड तोडा. जास्तीत जास्त मतदान करा. पोलींग बुथ प्रमुखांनी आपले बूथ जिंकवून दाखवा मी तुम्हाला संसद जिकवून दाखवतो. प्रत्येक बुथवर भाजपचा झेंडा फडकला पाहीजे. त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आता घरोघरी जा आणि घरातील ज्येष्ठांना माझा प्रणाम सांगा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी NARENDRA MODI यांनी केले. ते अंबाजोगाईत AMBAJOGAI आयोजित भाजपाच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारसभेत बोलत होते.


व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, पालकमंत्री धनंजय मुंडे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खा. प्रीतमताई मुंडे, आ. सुरेश धस, आ. प्रकाश सोळंके, आ. लक्ष्मण पवार, आ. नमिता मुंदडा, डॉ. योगेश क्षीरसागर आदींची उपस्थिती होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरूवातच परळीच्या वैद्यनाथाचे, आणि अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवीचे नाव घेऊन केली. मोदी म्हणाले, माझा आणि स्व. गोपीनाथजी मुंडे यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. मुंडेजी माझ्याकडे जेव्हा जेव्हा येत तेव्हा तेव्हा ते बीड आणि मराठवाड्याच्या विकासाचीच चर्चा करीत असत. माझं दुर्भाग्य असे की फार कमी सहवास मला त्यांचा लाभला. त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि त्यांना दिल्लीला घेऊन गेलो. तिथेच मी माझ्या मित्राला गमावले. त्या काळात मी अरूण जेटली, सुषमा स्वराज, मनोहर पर्रिकर यांच्या सारख्या प्रामाणिक साथीदारांना गमावले याचे मला दुःख आहे. त्यांच्या जाण्याने माझ्या मागे कामाचा मोठा व्याप वाढला. माझी परेशानी झाली. त्यामुळे आज इथे आलो त्यावेळी मला त्यांची आठवण झाली. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

मी तुमच्या मुलांच्या उज्ज्वल्ल भविष्यासाठी बाहेर पडलो आहे. भारताला सर्वाधिक चांगले बनविण्याचा माझा संकल्प आहे. पण जरा का इंडि आघाडीचे सरकार आले तर ते मिशन कॅन्सल म्हणून काम करतील. त्यांना आम्ही घेतलेल्या निर्णयातील आर्टीकल 370 पुन्हा लागू करतील. मोदींनी आणलेले सीएए हटवतील. तीन तलाक कानून कॅन्सल करतील. किसान सन्मान निधी कॅन्सल करतील. मुफ्त राशनची योजना बंद करतील. 55 कोटी लोकांना मोफत आरोग्य सुविधा देत आहोत तेही कॅन्सल करतील. इतकंच नाही तर ते राम मंदिराला देखील कॅन्सल करतील. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ज्यांनी काँग्रेसमध्ये आपली 20-25 वर्ष घातली त्यांनीच हा खुलासा केला. तेच म्हणाले इंडि आघाडी आली तर राम मंदिरवर सुप्रीम कोटाने जो फैसला दिला त्याला देखील बदलून टाकू असे ते म्हणत आहेत. आज देखील इंडिच्या एका नेत्याने असा आरोप केल्याचे मोदी म्हणाले.
काँग्रेसवाले प्रभू रामाच्या पुजेला पाखंड बोलत आहेत. तुष्टीकरण आणि मतांसाठी हे वारंवार प्रभू राम श्रीराम आणि राम भक्तांचा अपमान करीत आहेत. असले गठबंधन देशाचे आणि महाराष्ट्राचे गौरव वाढवणार आहे का? असा सवाल देखील पंतप्रधान मोदी यांनी केला.

इंडीचे लोक वोट जिहादची अपिल करीत आहेत. 26/11 च्या हल्ल्यातील आरोपींना ते क्लिनचिट देत आहेत. कसाबसोबत जे दहा आरोपी त्यावेळी पाकिस्तानातून आले त्यांना ते निर्दोष आहेत असे वाटत आहे. त्यांच्यासोबतच यांचे काहीतरी संबंध होते? असा आरोपही मोदींनी केला. पण देशवासिय यातील काहीच विसरले नाहीत. दिल्लीत बाटला हाऊसमध्ये मारलेले आतंकी यांच्यासाठी काँग्रेसचा सगळ्यात मोठा नेता रडत होता. हेच दिवस पुन्हा देशात वापस आणायचे आहेत का? लक्षात ठेवा मोदी मोठा दगड बनून तुमच्या समोर उभा आहे.

धर्माच्या आधारावर आरक्षण नाही
बाबासाहेब आंबेडकर यांनी एससीएसटीला आरक्षण दिले होते. बाबासाहेबांनी हे देखील सांगितले होते की धर्माच्या आधारावर आम्ही आरक्षण देणार नाहीत असे सांगितले होते. धर्माच्या आधारावर आरक्षण हे संविधानाच्या विरोधात आहे. एससी, एसटी, ओबीसीच्या वाटेचं आरक्षण हिसकावून घेऊन ते मुस्लिमांना देण्याचा प्रयत्न काँग्रेस करीत आहे. पण मी हे कधीही होऊ देणार नाही. एससी एसटी ला मिळालेले हे आरक्षण मुस्लीमांना देवून टाकायचे आहे. ही धोक्याची घंटा आहे. त्यासाठी इंडि आघाडीपासून सावधान रहावे लागेल. पण हा मोदी आहे. मी आपल्याला गॅरंटी देतो. जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत दुनियाची कोणतीही ताकद एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण काढून घेणार नाही ही मोदींची गॅरंटी आहे, असा विश्वास मोदींनी दिला. ते म्हणाले, असली राष्ट्रवादी, असली शिवसेना भाजपासोबत आहे. त्यांच्यासोबत नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी काँग्रेस आहे. हे नकली व्हीडिओ तयार करीत आहेत. काँग्रेसवाल्यांची सवय आहे की ‘न काम करो, ना काम करने दो’ महाराष्ट्र गुजरात दरम्यान बुलेट ट्रेनचा प्रकल्प सुरू केला होता. पण ह्यांचे सरकार जेव्हा आले तेव्हा यांनी काम थांबवले. या विकास विरोधी लोकांच्या हातात आपण सत्ता देणार आहोत का? असा सवाल मोदींनी उपस्थित केला.

मराठवाड्याच्या विकासाकडे कोणी लक्ष दिले नाही
महाराष्ट्र आणि मराठवाड्याकडे यांनी कोणीच लक्ष दिलेले नाही. 60 वर्षापासून मराठवाडा ग्रीड योजना ठप्प पडली होती. आज एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सिंचन योजना पुढे घेऊन जात आहेत. 27 प्रोजेक्ट पैकी 10 प्रोजेक्ट पूर्ण होत आहेत. बळीराजा जलसंजिवनी स्कीम थांबवली होती. पण तीला आता आम्ही गती दिली आहे. त्यामुळे मराठवाडा पाणी संकटापासून मुक्त होईल. मोदी हा गरीब कुटुंबातील आहे. त्यामुळे मला माहिती आहे की शेतकरी एका बियाणासाठी काय कसरत करतो. त्यासाठी बिमा पीक विमा योजनेची गॅरंटी दिली आहे. किसान सन्मान निधीत देखील वाढ केली आहे. भारतमाला परियोजनेच्या माध्यमातून रस्ते दिले. अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गचे निर्माण प्रगतीपथावर आहे. आज देश विकासाच्या रस्त्यावरून धावत आहे, असे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. यावेळी सभेला महाप्रचंड गर्दी होती.