जागोजागी नाकाबंदी, मोदींची होणार आहे सभा; त्याच भागातून एटीएम मशीन चोरी!

बीड
  • एटीएममध्ये 19 लाख रुपये होती रक्कम, अंबाजोगाई शहरातील घटना

बीड दि.5 : अंबाजोगाई शहरातील यशवंतराव चौक परिसरातून एटीएम मशीन अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे. यामध्ये 19 लाख रुपयांची रोकड असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अंबाजोगाईत सभा होणार असून त्या अनुषंगाने तगडा बंदोबस्त असतानाही ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दोन दिवसांनी म्हणजे 7 मे रोजी अंबाजोगाई शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकसभा निवडणूक भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे. त्या अनुषंगाने बीड पोलिसांचा तगडा बंदोबस्त आजपासून अंबाजोगाई शहरात डेरेदाखल आहे. एवढेच नव्हे तर स्वतः वरिष्ठ अधिकारी आणि शेजारील जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक देखील अंबाजोगाईत असल्याची माहिती आहे. तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने व मोदींच्या सभेच्या नियोजनात जागोजागी नाकाबंदी असतानाही चोरट्यांनी अंबाजोगोई शहरातील पाण्याच्या टाकीजवळ यशवंतराव चौक येथून अलगद रविवारी (दि.5) पहाटेच्या सुमारास एटीम मशीन लंपास केली आहे. विशेष हे चोरटे फरार होताना कुणालाही आढळून आले नाही. या एटीममधे 19 लाख रुपयांची रोकड होती. घटनास्थळी वरिष्ठांनी व स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने धाव घेतली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

वरिष्ठ म्हणतात आम्ही बंदोबस्तात.

या संदर्भात अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांना विचारले असता त्यांनी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होणाऱ्या सभेच्या बंदोबस्त नियोजनात असल्याचे सांगितले. तर उपअधीक्षक अनिल चोरमले यांनीही बंदोबस्तात बिझी असल्याचे सांगितले. सगळेच पोलीस बंदोबस्तात, तसेच वरिष्ठ अधिकारीही बंदोबस्तात बिझी असल्याने शहरात चोऱ्या करण्यासाठी चोरट्यांना मोकळीक दिली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Tagged