राज्य निवडणूक आयोगाचे आदेश
बीड : राज्यातील २५ जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत २८४ पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दि.५ जुलै रोजी दिले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार दि.२७ जून रोजी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे आरक्षण सोडतीच्या प्रक्रियेकडे लक्ष लागले होते. आता जिल्हा परिषदेच्या आरक्षणाची सोडत जिल्हाधिकाऱ्यांनी तर पंचायत समिती स्तरावरील आरक्षणाची सोडत तहसीलदारांनी करावी. या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांपेक्षा कमी नसलेल्या दर्जाचा अधिकारी नेमावा, अशा सूचना आहेत.
अशी आहे आरक्षण सोडत प्रक्रिया
अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण महिला यांच्या आरक्षण सोडतीची सूचना स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी दि.७ जुलै रोजी प्रसिद्ध करायची आहे. त्यानंतर जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तर पंचायत समिती निर्वाचक गणासाठी तहसीलदारांनी दि.१३ जुलै रोजी सोडत काढायची आहे. त्यानंतर आरक्षणाची प्रारूप अधिसूचना दि.१५ जुलै रोजी जिल्हाधिकारी प्रसिद्ध करतील. तसेच, दि.१५ ते दि.२१ जुलै दरम्यान हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी असणार आहे. या हरकती जिल्हाधिकाऱ्यांनी दि.२५ जुलै रोजी आयोगाकडे पाठवायच्या आहेत. दि.२९ जुलै पर्यंत गट, गणास आरक्षणास मान्यता देण्यात येईल. त्यानंतर जिल्हाधिकारी हे अंतिम आरक्षण विहित नमुन्यात शासन राजपत्रात दि.२ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करतील.