कोकणातले पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी पंकजाताईंना संधी द्या- धनंजय मुंडे

बीड

अंबाजोगाई, दि.7 : कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी नाशिक धरणात आणून तेथून ते जायकवाडी, माजलगाव परळीपर्यंत आणून येथील शेती बागायती करण्यासाठी पंकजाताई मुंडे यांना संसदेत पाठवा, असे आवाहन पालकमंत्री धनंजय मुंडे DHANANJAY MUNDE यांनी केले. पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या व्यासपीठावरून बोलत होते.

पुढे बोलताना पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, आजची ही विजयी संकल्प सभा नसून विजयावर शिक्कामोर्तब करणारी सभा आहे. पंकजाताईंच्या विजयाची गॅरंटी घ्यायला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अंबाजोगाई येथे आले होते. त्यावेळी ते बोलत होते. ही निवडणूक विकासाच्या मुद्यावर लढवली जाणे अपेक्षीत आहे. हा बीड जिल्हा कायम मागासलेला जिल्हा म्हणून परिचित आहे. पण आता हा मागासलेपणा दूर करून जिल्हा ऊसतोड मजूरांचा जिल्हा नव्हे तर ऊस उत्पादकांचा जिल्हा म्हणून प्रसिध्दी करायचा आहे. इथली माती सुपिक आहे. परंतु इथे शेतीसाठी पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे येणार्‍या काळात कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी आपल्याला नाशिकच्या धरणात आणायचे आहे. तिथून ते जायकवाडी धरणात तिथून ते माजलगाव धरणात अन् पुढे परळीच्या तांदळवाडी येथून धनेगाव बोरणा येथे नव्याने होणार्‍या तलावात नेण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे सुमारे 42 टीएमसी पाणी जिल्ह्याला मिळणार आहे. यासाठी 1 लाख 17 हजार कोटी रुपये खर्चासाठी तत्वतः मान्यता देखील देण्यात आली आहे. यातील 50 हजार कोटी रुपये केंद्र सरकारकडून मिळाले तर या कामाला तातडीने सुरूवात देखील होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण करायचा असेल तर आपल्या जिल्ह्याचं नेतृत्व म्हणून पंकजाताईंच्या नेतृत्वाखाली आपल्याला कमळाला मतदान करावं लागणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यास, जिल्ह्याची 8 लाख हेक्टर जिरायती शेतीपैकी 7 लाख हेक्टर शेती बागायती होणार आहे. त्यासाठी केंद्रात आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार हवे. अन् जिल्ह्याचा खासदार देखील त्याच विचाराचा असायला हवा.

घाटनांदूर-अंबाजोगाई रेल्वेमार्ग जोडणार
जेवढ्या मताची लीड जास्त असेल तेवढ्या मोठ्या प्रमाणात बीड जिल्ह्याच्या विकासाला पैसा येणार आहे. घाटनांदूर ते अंबाजोगाई हा रेल्वेमार्ग जोडायचा आहे. ही पंकजाताई आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी आहे. आपली लेक अनुक्रमांक एक पंकजा गोपीनाथ मुंडे यांना देशाच्या सार्वभौम सभागृहात पाठवा, असेही धनंजय मुंडे म्हणाले.

मुंडे बंधू – भगिनीने मिळून मोदींजींना बांधला फेटा
दरम्यान या सभेस संबोधित करण्यासाठी आलेले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मराठवाड्याची ओळख असलेला खास फेटा पंकजाताई मुंडे यांनी दिला, फेटा व्यवस्थित न बसल्याचे पाहून धनंजय पुढे सरसावले व तो फेटा धनंजय मुंडे यांनी बांधून व्यवस्थित बसवून दिला.

चंदन तस्कराला तुम्ही संसदेत पाठवणार आहात का?
पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला. मुंडे म्हणाले, या चंदन तस्कराला तुम्ही देशाच्या संसदेत पाठवणार आहात का? त्यांना मत द्यावा की न द्यावं याचा विचार मतदार बंधू भगीनी नक्की करणार आहेत, असेही पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले.