बीड येथील शिवाजीराव हार्ट केअर युनिटची जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार

न्यूज ऑफ द डे बीड

डॉ.अरूण बडे यांची नातेवाईकांशी अरेरावी

बीड : येथील शिवाजीराव हार्ट केअर युनिट या रुग्णालयात रुग्णांची लूट केली जात आहे. तसेच, डॉ.अरूण बडे यांनी रूग्णाच्या नातेवाईकांशी अरेरावी केल्याची तक्रार शिरूर कासार तालुक्यातील वारणी येथील भाऊसाहेब एकनाथ केदार यांनी मंगळवारी (दि.3) जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

   तक्रारीत म्हटल्याप्रमाणे, तक्रारदारांच्या आई प्रयागबाई एकनाथराव केदार यांना हृदयविकारामुळे दि.25 ऑक्टोबर रोजी येथील शिवाजीराव हार्ट केअर युनिट या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉ.अरूण बडे यांनी अँजिओग्राफी व अँजिओप्लॅस्टी करण्याचा सल्ला दिला. त्यासाठी सुरुवातीस दीड लाख रुपयांची मागणी केली होती. सदरील शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून करण्याची विनंती नातेवाईकांनी केली. परंतू डॉ.बडे यांनी जनआरोग्य योजनेतून शस्त्रक्रिया होणे शक्य नसल्याचे सांगत शस्त्रक्रिया वाढल्या असून दोन लाख रुपये खर्च सांगितला व तगादा लावला. त्यामुळे केदार यांनी 75 हजार रूपये रोख भरले. तसेच, जनआरोग्य योजनेसाठी अर्ज केला असता त्यांचा अर्ज मंजूर करण्यात आला. त्यानंतर डॉ.बडे यांनी डिस्चार्ज वेळी बिले देतो असे सांगून शस्त्रक्रिया केल्याच्या तिसर्‍या दिवशी जनआरोग्य योजनेची कागदपत्रे मागवून घेत 1 लाख रूपयांची बिले तयार केली व योजनेची मान्यता घेतली. तसेच, शस्त्रक्रियेच्या चौथ्या दिवशी रुग्णांच्या व नातेवाईकांच्या जबरदस्तीने स्वाक्षर्‍या घेतल्या. त्यानंतर बिल मागितली असता 83 हजार 529 रूपयांचे बिल त्यांनी दिले. रुग्णाच्या प्रकृतीची विचारपूस केली, त्यावेळी डॉ.बडे यांनी अरेरावी करत भाऊसाहेब केदार यांना अपमानास्पद वागणूक दिली. व रुग्णाला इथून हालवा असे उद्धटपणे सांगितले असल्याचा आरोप भाऊसाहेब केदार यांनी तक्रारीत केला आहे. दरम्यान, डॉ.अरूण बडे यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने त्यांचे म्हणणे समजू शकले नाही.

जनआरोग्य योजनेतून रूग्णालय वगळा
शिवाजीराव हार्ट केअर युनिट या रुग्णालयाची कसून चौकशी करून तातडीने कार्यवाही करावी. तसेच, जनआरोग्य योजनेतून रूग्णालय रूग्णांची लूट करून स्वतःचा फायदा करून घेत असल्याचे समोर आल्यामुळे योजनेतून रूग्णालय वगळावे अशी मागणी देखील भाऊसाहेब केदार यांनी केली आहे.

Tagged