आ. प्रकाश सोळंके यांची माहिती
बीड, दि.14 : पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई देण्यास नकार देण्यात येत असल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला आहे. त्यामुळे कंपनी आणि सरकारवर दबाव तयार करण्यासाठी आज आ.प्रकाश सोळंके यांनी शासकीय विश्रामगृहावर सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत 16 सप्टेंबर 2022 शुक्रवार रोजी दुपारी 12 ते 4 दरम्यान धरणे आंदोलन करण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती आ.सोळंके यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या बैठकीस माजी आ.राजेंद्र जगताप, आ.जनार्धन तुपे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, किसान मोर्चाच्या सुशीलाताई मोराळे, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप, विजयसिंह पंडित, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, वंचित बहुजनचे अशोक हिंगे, वंचितचे जिल्हाध्यक्ष उध्दव खाडे, माजी जि.प सदस्य अजय मुंडे, शेतकरी नेते डॉ.उध्दव घोडके, धनंजय गुंदेकर, आदींची उपस्थिती होती.
यावेळी सर्वांनी आपआपली भुमिका बैठकीत मांडली. पिकविम्याबरोबरच इतरही अनेक प्रश्न बैठकीत मांडण्यात आले. सर्वानुमते 16 सप्टेंबर 2022 रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 12 ते 4 दरम्यान धरणे आंदोलन करण्याबाबत एकमताने निर्णय घेण्यात आला. त्यानुसार बीड जिल्ह्यात सरसकट पीकविमा मंजूर करून 25 टक्के अग्रीम तातडीने देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
जिल्हाधिकार्यांकडून अधिकृत नोटीफिकेशन नाही
बीड जिल्ह्यातील काही वृत्तपत्रात आणखी काही मंडळांना अग्रीम देण्याबाबत निर्णय झाल्याच्या बातम्या प्रकाशीत झालेल्या आहेत. मात्र असा कुठलाही निर्णय जिल्हाधिकार्यांकडून जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे सरसकट विमा मंजूर करण्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत शेतकर्यांनी कुठल्याही गोष्टींवर विश्वास ठेऊ नये. 16 सप्टेंबर रोजी होणार्या किसान सभेच्या मोर्चाला उपस्थित रहावे, असे आवाहन अजय बुरांडे, जगदीश फरताडे यांनी केले आहे.
83 पैकी केवळ 16 मंडळात निर्णय
जिल्ह्यात जुने आणि नवे मिळून एकूण 83 महसूल मंडळ आहेत. यापैकी केवळ 16 मंडळात अग्रीम देण्याचा निर्णय झालेला आहे. तर काल झालेल्या बैठकीत आणखी दहा ते 12 मंडळाचा समावेश होण्याची शक्यता आहे. परंतु सरसकट नुकसान झालेले असल्याने सर्वच्या सर्व 83 मंडळात विमा भरपाई मिळायला हवी, अशी मागणी शेतकरी पुत्रांकडून होत आहे. त्यासाठी किसान सभेच्या नेतृत्वात शेतकर्यांनी सोशल मीडियावर जबरदस्त ट्रेंड चालवून प्रशासन आणि विमा कंपनीला घाम फोडला होता. जर ट्रेंडवर महसूल मंडळ वाढविले जात असतील तर मोर्चा आणि आंदोलनाने सरसकट विमा द्यायला आम्ही भाग पाडू असे किसान मोर्चाचे जगदीश फरताडे म्हणाले.
4 लाख हेक्टरवरील लागवड गेली
जून आणि जुलै या महिन्यात अतिवृष्टी आणि गोगलगायीमुळे सोयाबीनचे नुकसान झाले. तर संपूर्ण ऑगस्ट महिन्यात सलग 27 दिवस पावसाचा खंड पडलेला होता. मात्र एक ते दिड मिली पाऊस झाल्याचे दाखवून कंपनीने पीकविमा नाकारला आहे. महसूल मंडळाने केलेल्या सर्वेत 86 मंडळामध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेले आहे. मात्र तरीही विमा कंपनी नुकसान भरपाई द्यायला विविध कारणे दाखवून शेतकर्यांना विमा नाकारत आहे. सुमारे 4 लाख हेक्टरवरील सोयाबीन लागवडीचे नुकसान झाल्याचे आ.प्रकाश सोळंके यांनी सांगितले.
———-