केज दि.5 : गावात स्मशानभूमी नसल्यामुळे अंत्यविधीचा मोठा प्रश्न निर्माण होतो. सोनेसांगवी येथे एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर बुधवारी (दि.5) सकाळी नातेवाईकांनी मृतदेह थेट केज तहसील कार्यालयात आणला. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तालुक्यातील सोनेसांगवी येथील लक्ष्मीबाई शहाजी कसबे या महिलेचे निधन झाले. गावात स्मशानभूमी नसल्याने अंत्यविधी कुठं करावी? हा प्रश्न निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी चक्क मृतदेह केज तहसील कार्यालयात आणला आहे. अचानक झालेल्या या प्रकारामुळे तालुका प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. मोठा जमाव जमल्याने काहीसे तणावाचे वातावरण निर्माण झाले. ग्रामस्थांना शांत करण्यासाठी तहसीलदारांनी ग्रामस्थांशी चर्चा केली परंतु ते स्मशानभूमीसाठी आजच जागा द्या या मागणीवर ठाम आहेत. या प्रकरणी तहसीलदार यांच्या दालनात सध्या बैठक सुरू असून तहसीलदार काय तोडगा काढतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. सुर्डी व सोनेसांगवी या गावांना गायरान नसल्याने माळेगाव शिवारात दोन्ही गावांना स्मशानभूमीसाठी जागा दिलेली आहे. तसेच सोनेसांगवी ग्रामपंचायतीने गावातीलच सार्वजनिक जागा स्मशानभूमीसाठी दिल्याचा ठराव दिलेला अशी ही चर्चा आहे. परंतु याबाबत अधिकृत माहिती नसल्यामुळे तालुका प्रशासन सध्या सर्व कागदपत्रांची तपासणी करत असल्याचे सांगितले जात आहे.