BEED SP OFFICE

बीड एलसीबीत मॅनेज नाही तर मेरीटवाला अधिकारी हवा!

न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा महाराष्ट्र


वर्णी लावण्यासाठी अनेकांची सुरुय धडपड; नियुक्तीसाठी आणखी चार दिवसांची प्रतिक्षा
केशव कदम । बीड

दि.24 : येथील स्थानिक गुन्हे शाखेतील (BEED LCB) सतीश वाघ यांची नुकतीच प्रशासकिय कारणाने संभाजीनगर येथे बदली झाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख म्हणून कुणाची नियुक्ती होणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. पोलीस दलात महत्वाची शाखा म्हणून या शाखेकडे पाहिले जाते. त्यामुळे या पदावर मॅनेज नाही तर मेरीटवाला अधिकारी असणे गरजेचे आहे. आपली स्थानिक गुन्हे शाखेचा प्रभारी (LCB BEED) म्हणून नियुक्ती व्हावी, यासाठी अनेकांची धडपड सुरु असून येत्या चार दिवसात ही प्रतिक्षा संपणार असल्याची माहिती आहे. (Beed LCB Wants Meritwala Officer!)

चोरी, घरफोडी, दरोडा, सोनसाखळी चोरी, लूटमार, खून या घटनांसह अवैध पिस्टल, नशाखोरी आदी घटनांची संख्या जिल्ह्यात अधिक आहे. याला आळा घालण्याचे काम फक्त स्थानिक गुन्हे शाखाच करु शकते. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेत येणारा प्रभारी अधिकारी हा मेरीटवाला असणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा स्थानिक गुन्हे शाखेत नियुक्ती मिळवत मिळालेल्या अधिकाराचा गैरवापर करत नंगानाच केल्याचे जिल्ह्याने पाहिलेले आहे. असा अधिकारी मिळाल्यास सर्वसामान्यांना न्याय मिळत नाही. तसेच जिल्हा पोलीस दलाची प्रतिमाही डागाळली जाते. सध्या जिल्हा पोलीस दलात चांगले अधिकारी आहेत. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर (NANDKUMAR THAKUR) यांची प्रतिमा जनमाणसात चांगली आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचा प्रभारी निवडताना चांगली वर्तणूक असणारा, गुन्ह्याची उकल करणारा, लाच घेताना न पकडलेला असा अधिकारी देवून त्या पदाला न्याय द्यावा.

निरीक्षकाचे पद असलेल्या ठाण्यामध्ये
सहायक निरीक्षक न देण्याच्या सूचना

पोलीस निरीक्षकाचे पद असलेल्या ठाण्यातही सहायक निरीक्षकांवर जबाबदारी देण्यात आली आहे. परंतू आयजी चव्हाण यांनी निरीक्षकाचे पद असलेल्या ठाण्यात सहायक निरीक्षक न देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर सध्या नियंत्रण कक्षात विश्वास पाटील, सुनिल नागरगोजे, विलास पाटील, अशोक मोदीराज, संतोष खेतमाळस, देविदास गात, शिवाजी बंटेवाड, अजीनाथ काशिद हे आठ अधिकारी आहेत. त्यामुळे प्रत्येक ठाण्यात निरीक्षक मिळणार असल्याचे चित्र आहे.

सुनिल नागरगोजे की संतोष साबळे?
स्थानिक गुन्हे शाखेसाठी सध्या दोनच नाव चर्चेत आहेत. ते म्हणजे सुनिल नागरगोजे व संतोष साबळे यांची. नागरगोजे हे पहिल्यांदाच जिल्ह्यात येत असून ते मुळचे बीड जिल्ह्यातीलच असल्याची चर्चा आहे. तर साबळे हे बीड ग्रामीण ठाण्यात प्रभारी असून त्यांनी सहायक निरीक्षक असताना वडवणीसह इतरत्र काम केल्याची माहिती आहे.

ठाणेदारांची खांदेपालट, नवीन
अधिकार्‍यांना मिळणार नियुक्ती

बीड जिल्हा पोलीस दलातील बीड ग्रामीणचे संतोष साबळे, शहर ठाण्याचे रवी सानप, शिवाजीनगर ठाण्याचे केतन राठोड, नेकनूर पोलीस ठाण्याचे शेख मुस्तफा, बर्दापूर पोलीस ठाण्याचे अशोक खरात, अंमळनेर पोलीस ठाण्याचे गोरक्ष पालवे यांचा ठाण्यातील कालावधी पूर्ण झाला असून त्यांना इतरत्र नियुक्ती मिळणार आहे. तर स्थानिक गुन्हे शाखा, सायबर पोलीस ठाणे, जिल्हा वाहतूक शाखा, अंभोरा पोलीस ठाणे, शिरुर पोलीस ठाणे, पेठबीड पोलीस येथे प्रभारी अधिकार्‍यांची नियुक्ती केली जाणार आहे.

अंमलदारांच्या बदल्या समाधानकारक,
ठाणेदारांच्या बदल्यामध्ये काय होणार?

मागील अनेक वर्षात पहिलांदाच जिल्हा पोलीस दलातील अंमलदारांच्या बदल्या समाधानकारक झाल्याचे चित्र होते. अनेक कर्मचार्‍यांनी तर ‘नंदकुमार ठाकूर देव माणूस’ असे स्टेटस ठेवल्याचे पहायला मिळाले. आता सर्वात महत्वाच्या स्थानिक गुन्हे शाखेसह इतर ठाण्यात प्रभारी निवडताना नंदकुमार ठाकूर यांना मेरीटवाल्या अधिकार्‍यांना संधी द्यावी लागणार आहे.

Tagged