Site icon कार्यारंभ लाईव्ह

बीडमध्ये आरोग्यविषयक कोणत्याच बाबींची कमतरता भासू देणार नाही

मुंबई : मराठवाड्यातील कोविड परिस्थितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्हीडिओ कॉन्फरन्स बैठकीत बीड जिल्ह्यातील कोविड विषयक समस्यांकडे शनिवारी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांचे लक्ष वेधले. यावेळी ऑक्सिजनचा मागणीनुसार पुरवठा करणे, रेमडीसीवर इंजेक्शनची मुबलक प्रमाणात उपलब्धी यासह कोविडसाठी अधिकच्या निधीबाबत सकारात्मक चर्चा झाली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ना. मुंडे हे सह्याद्री अतिथीगृह येथून व्हीडिओ कॉन्फरन्स द्वारे सहभागी झाले होते, या बैठकीस आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांच्यासह मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री यांसह जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक व अन्य महत्वाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान ना. धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील आरोग्यविषयक उपाययोजनांचा समग्र आढावा सादर करून जिल्ह्यातील सद्यस्थीतीबाबत मुख्यमंत्री यांना अवगत केले. बीड जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा मागणीपेक्षा काही प्रमाणात कमी असून रेमडीसीवर या महत्त्वाच्या इंजेक्शनचा देखील सध्या तुटवडा जाणवत आहे. फैबीफ्लू सह अन्य औषधी मुबलक प्रमाणात उपलब्ध होणे यासह अन्य सर्वसमावेशक बाबींवर यावेळी सविस्तर चर्चा झाली. या बैठकीस पालकमंत्री ना. मुंडे यांच्यासह बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक आर. राजा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पवार आदी बीड येथून उपस्थित होते. बीड जिल्ह्यातील प्रतिरुग्ण कॉन्टॅक्ट ट्रेसिंग रेशो हा विभागात अव्वल असून कोरोना मुक्तीचे प्रमाणही 70% च्या घरात आहे, याबाबत मुख्यमंत्र्यांनी बीड जिल्ह्यातील सर्वच कोरोना योद्ध्यांचे यावेळी कौतुक केले. येत्या काही दिवसात जिल्हाभरात व राज्यात राबविण्यात येत असलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानात प्रत्येक घटकाने सर्व क्षमतेने आपले योगदान देऊन हे अभियान यशस्वी करावे व कोरोनाला ठरवण्यासाठी सज्ज व्हावे असेही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी केलेल्या मागणीनुसार ऑक्सिजन पुरवठा तसेच रेमडीसीवर इंजेक्शन व अन्य औषध सामग्री तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत संबंधितांना निर्देश दिले असून बीड जिल्ह्याच्या आरोग्यविषयक योजनांसाठी अधिकचा निधी उपलब्ध करून देण्यास सकारात्मक असल्याचे आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे म्हणाले.

Exit mobile version