Site icon कार्यारंभ लाईव्ह

महिला पोलिसाला पोलीस पतीनेच विष पाजले

बीड : महिला पोलीस कर्मचारी असलेल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पोलीस पतीसह त्याच्या कुटूंबियांनी तिला जबरदस्तीने विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अंबाजोगाई शहरात रविवारी (दि.27) सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी पतीसह दहा जणांवर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

पोलीस कर्मचारी असणारे हे दाम्पत्य सध्या अंबाजोगाई उपविभागांतर्गत एकाच ठाण्यात कर्तव्यावर आहे. दोन वर्षापूर्वी त्यांचा विवाह झाला होता. 28 वर्षीय पिडीत विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार लग्नानंतर सुरूवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मारहाण सुरू केली. पतीच्या सांगण्यावरून सासू-सासरा, दिर, जाऊ आणि इतर नातेवाईकांनी देखील तिला शिवीगाळ करून मारहाण करत असत. याबाबत पिडीतेने पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला तक्रार निवारण केंद्रातही धाव घेतली. दरम्यान, पिडीतेची बदली झाल्यामुळे ती अंबाजोगाईतील रायगड नगर भागात किरायाने राहू लागली. रविवारी सकाळी पिडीतेकडून सासूच्या मोबाईलवर चुकून कॉल लागला. तू कॉल का केलास याचे भांडवल करत तिचा पती, सासू-सासरा, दीर, नणंद, सवत, भावजय व इतर नातेवाईक रविवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास स्कॉर्पिओ (एमएच 44 जी 2366) आणि दुचाकीवरून पिडीतेच्या रायगड नगर येथील घरी आले. पिडीतेला जबरदस्तीने विषारी औषध पाजले असे तिने तक्रारीत नमूद केले आहे. पुढील तपास सहा. पोलीस निरिक्षक दहिफळे करत आहेत.

Exit mobile version