Site icon कार्यारंभ लाईव्ह

भाजपा आणि राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार घोटाळेबाज -रमेश पोकळे

ramesh pokale

ramesh pokale

औरंगाबाद, दि.24 : भाजपाचे उमेदवार शिरीष बोराळकर पदवीधरांच्या प्रश्नावर जेलमध्ये गेले होते का? असा सवाल मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे अपक्ष उमेदवार रमेश पोकळे यांनी केला. शिवाय राष्ट्रवादीने उभे केलेले उमेदवार हे देखील टेंडरमधील घोटाळेबाज आहेत, असा आरोप देखील पोकळे यांनी केला.

ते औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. पोकळे म्हणाले, पदवीधर मतदार संघ निवडणूक लढवत असलेल्या राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार घोटाळेबाज असून त्यांचे शिक्षण क्षेत्रात योगदान काय? पदवीधरांना मतदान मागण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही. मी मागील 22 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात काम करीत आहे. पदवीधर व शिक्षकांच्या अनेक प्रश्नावर मी आंदोलन केले. मात्र भाजपा व राष्ट्रवादी यांनी दिलेल्या दोन्ही उमेदवारांचे शिक्षण क्षेत्रात पदवीधरांच्या क्षेत्रात योगदान काय? असा खडा सवाल करून हे दोन्ही उमेदवार घोटाळेबाज आहेत. पदवीधरांना आणि शिक्षकांना मते मागण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही. एक उमेदवार टेंडर वाला तर दुसरा व्हेंडरवाला आहे. निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांनी उमेदवार निवडताना कोणते निकष लावले हा संशोधनाचा विषय आहे. स्वर्गीय मुंडे साहेबांचा मरणोत्तर अवमान बॅनर वरून फोटो काढून केला. भाजपने या निवडणुकीत डमी उमेदवार का दिला असा सवाल देखील त्यांनी केला. आपल्याला षडयंत्र करून उमेदवारी डावलली असा आरोप केला. न्यायासाठी मी पदवीधरांच्या दारात उभा आहे. विविध पक्ष आणि संघटनाचे बडे बडे नेते कार्यकर्ते आपल्याला मदतीचा हात देत आहेत. या निवडणुकीत परिवर्तन घडून येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिक्षण क्षेत्राचा खेळखंडोबा आणि पदवीधर आयुष्यातून उध्वस्त होत असताना विद्यमान आमदार आवाज उठवित नाहीत, अशी घणाघाती टीका केली. माझे शैक्षणिक व सामाजिक काम पाहून मला समाजातील विविध संघटना पाठिंबा देत आहेत. त्यामुळे मी या निवडणुकीत विजयी होणार असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मी दीड हजार बेरोजगारांना 64 कोटीची मदत स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून केली असून त्यातून 1500 पदवीधारक नव्या व्यवसायाला लागले आहेत. पंधराशे पदवीधर बेरोजगारांना 64 कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले. 32500 पदवीधरांना घरपोच पदवी प्रमाणपत्रे वाटले, वेळोवेळी सामाजिक आंदोलनात सहभागी झालो. बीडमधील वस्तीशाळा व अतिरिक्त दोन हजार शिक्षकांना न्याय मिळवून दिला असल्याचे उमेदवार रमेश पोकळे यांनी यावेळी सांगितले. या पत्रकार परिषदेला शिक्षक संघाचे बी.जी. पवार, राजकुमार कदम, जल्हाध्यक्ष सुभाषराव पाटील, वैभव गाडेकर, शशिकांत माने तर संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकरराव माने, प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे, संघटक सखाराम काळे, के.पी. गुंठे, प्रवीण पवार, आदी उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत मराठवाडा शिक्षक संघ आणि संभाजी सेना यांनी जाहीर पाठिंबा दर्शविला त्यामुळे पोकळे यांचे पारडे जड झाले आहे.

Exit mobile version