Site icon कार्यारंभ लाईव्ह

एवढ्या गर्दीत फिरणं बरं नव्हं…!

बीड दि.8 : कालपासून जिल्ह्यात लॉकडाऊन शिथिल करण्यात आले. आणि खरेदीसाठी नागरिकांची सगळीकडे उडी पडली. असं कुठलेही दुकान नसेल तिथं गर्दी नव्हती. शहरातील सर्वच दुकाने खचाखच भरलेली दिसून आली; पण एवढ्या गर्दीत घुसणे हे जीवासाठी बरं नव्हे. कारण कोरोना अजुनही गेलेला नाही. फक्त बेड रिकामे झाल्यामुळे शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे आजही काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोनाचा आकडा कमी झाला म्हणून लगेच मास्क फेकूण देऊ नका, मागचे दिवस पुढे आणू नका.. खरेदी महत्वाची आहे. पण त्यापेक्षाही जास्त महत्वचा जीव आहे.

राज्यात कोरोना बाधितांची आकडेवारी कमी झाल्यामुळे पाच टप्पयात वेगवेगळे निर्बंध हटवण्यात येत आहेत. बीड जिल्ह्याचा समावेश तिसर्‍या टप्प्यात आहे. या ठिकाणी अत्यावश्यक आणि इतर सर्व व्यवहार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. फक्त त्यासाठी वेळेची मर्यादा घालून देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील व्यवसायासह इतर सर्व व्यवसाय सकाळी 7 ते दुपारी 4 या वेळेत सुरू असणार आहेत. दरम्यान, सोमवारी अनलॉकच्या पहिल्याच दिवशीपासून दिवशी नागरिकांची बाजारपेठेत मोठी गर्दी पहायला मिळाली. बँका, कापड, इलेक्ट्रॉनिक्स, भांडी, ऑटोमोबाइल्स, दारुची दुकाने, सराफा, मोबाईल शॉपी आदी सह सर्व प्रकारची दुकाने ग्राहकांच्या गर्दीने गजबजली होती. लोक मोठ्या संख्येने बाहेर पडल्याने सुभाष रोड, भाजी मंडई, बशीरगंज, मोंढा परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर अशा महत्त्वाच्या भागांमध्ये 7 ते 4 या वेळेत वाहतुकीची कोंडी होत होती. पोलिसांना वारंवार वाहतूक सुरळीत करावी लागत असल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या आदेशानुसार, बीड जिल्ह्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत जमावबंदी आदेश लागू असतील, तर त्यानंतर सायंकाळी 5 ते सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे.

Exit mobile version