Site icon कार्यारंभ लाईव्ह

दोन लिपिक एसीबीच्या जाळ्यात!

ACB TRAP


बीड : दि. 24 : तक्रारदाराच्या प्रवास भत्त्याचा धनादेश मंजूर करण्यासाठी फोनवर एका लिपिकाने लाच मागितली तर व हा धनादेश प्रदान करण्यासाठी पंचासमक्ष दुसऱ्या लिपिकाने लाच स्वीकारली, या प्रकरणी सोमवारी (दि.24) दोन लिपिकावर बीड एसीबीने कारवाई केली. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुंदन अशोक गायकवाड, प्रथम लिपिक (मध्यम प्रकल्प कार्यकारी अभियंता कार्यालय, उस्मानाबाद) व पोपट श्रीधर गरुड, वरिष्ठ लिपिक ( लघु पाटबंधारे उप विभाग आष्टी) अशी लाचखोरांची नावे आहेत. तक्रारदार लोकसेवक यांचे प्रवास भत्ता देयकाचा 19 हजार 410 रुपयांचा धनादेश मंजूर केल्याचा मोबदला म्हणून कुंदन गायकवाड याने फोनवर 2 हजार रुपये लाचेची मागणी केली. तर पोपट गरुड यांनी मंजूर झालेला 19 हजार 410 रुपयांचा धनादेश त्यांना प्रदान करण्यासाठी स्वतः व गायकवाड यांचे मिळून एकत्रित असे 20 टक्के प्रमाणे लाच रक्कम 3 हजार 882 रुपये मागणी केली. तडजोडअंती 3 हजार 880 रुपये स्विकारण्याचे मान्य केले. गरुड यांना 3 हजार 880 रुपयाची लाच रक्कम लघु पाटबंधारे उपविभाग आष्टी या कार्यालयात स्विकारताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी दोघांवर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड उपअधीक्षक शंकर शिंदे, पोलीस अंमलदार सुरेश सांगळे, भारत गारदे, संतोष राठोड, अमोल खरसाडे, गणेश मेहेत्रे यांनी केली.

Exit mobile version