Site icon कार्यारंभ लाईव्ह

पत्नीने पगाराच्या हिशोेबाचा तगादा लावल्यामुळे वनरक्षकाची आत्महत्या

corona pecaint suicide


आष्टी तालुक्यातील घटना; पत्नीसह चौघांवर गुन्हा
आष्टी
दि.20 : लग्नाच्या अगोदर खर्च केलेल्या पगाराचा हिशोब द्या, असा तगादा पत्नीने वनरक्षक असलेल्या पतीच्या मागे लावला. तसेच आई-वडिलांना पैसे दिल्यामुळे तिने पतीला मारहाणही केली आणि शेती माझ्या नावावर कर म्हणून सतत त्रास देऊ लागली. पत्नीच्या नेहमीच्या छळाला कंटाळलेल्या पतीने अखेर दिड महिन्यापूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पत्नीसह चौघांवर आष्टी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला.

अनिल आबासाहेब जगताप (रा. टाकळसींग, ता. आष्टी) असे त्या मयत वनरक्षकाचे नाव आहे. त्यांचे वडील आबासाहेब जगताप यांच्या फिर्यादीनुसार अनिल यांचा विवाह 2014 साली देसूर येथील अजिनाथ देवराव भवर यांची मुलगी अश्विनी हिच्यासोबत झाला होता. अवघ्या दहा दिवसातच ते दोघे अनिलच्या नोकरीच्या ठिकाणी शिरूर येथे राहण्यासाठी गेले. त्यानंतर पती-पत्नीत सातत्याने वाद होऊ लागला. लग्ना अगोदरच्या पगारच्या खर्चाचा हिशोब ती मागू लागली. तसेच तुमच्या आई-वडिलांना पैसे द्यायचे नाही असेही तिने बजावले. दरम्यानच्या काळात बदलीमुळे ते कडा येथे राहण्यासाठी आले. त्यानंतर आई-वडिलांना घरासमोर फरशी करण्यासाठी पैसे दिल्यामुळे अश्विनीने अनिलच्या डोक्यात तुंबा मारला होता. याबाबत अश्विनीच्या आई-वडिलांना कळवले असता त्यांनी मुलीचीच बाजू लावून धरली. तीन वर्षापूर्वी अनिल बदलीमुळे आष्टीत स्थायिक झाले. त्यानंतर अश्विनीने जमीन नावावर करून दे असा तगादा लावत अनिलचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला. यावर्षी मे महिन्यात अश्विनीने कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेचे कारण काढून माहेरी गेली. अनिलने वारंवार फोन करूनही तिने परत येण्यास नकार दिला. जमीन आणि प्लॉट नावावर केल्याशिवाय येणार नाही असे तिने अनिलला बजावले. अखेर या सततच्या छळाला कंटाळलेल्या अनिलने 28 मे रोजी दुपारी 3 वाजताच्या नंतर कधीतरी शृंगेरी देवीचे समोरुन जाणार्‍या मुगगाव रोडवर एका वडाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली असे फिर्यादीत नमूद आहे. ही घटना 29 मे रोजी उघडकीस आली. सदर फिर्यादिवरून अजिनाथ देवराव भवर, विजुबाई अजिनाथ भवर, अश्विनी अनिल जगताप आणि महेश अजिनाथ भवर या चौघांवर शनिवारी (19 जून) अनिलला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून आष्टी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला.

Exit mobile version