Site icon कार्यारंभ लाईव्ह

बीड न.प.मध्ये अनागोंदी कारभार; ६ अधिकारी, कर्मचारी निलंबित

आ.विनायक मेटेंच्या लक्षवेधीनंतर शासनाची घोषणा

बीड : येथील नगरपालिकेतील अनागोंदी कारभार हा अधिकारी, कर्मचाऱ्यांना चांगलाच भोवला आहे. कर्तव्यात कसूर करणे, नगरपालिकेतील अनियमिततेचा ठपका ठेवून ६ अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

मुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुट्टे, जिल्हा प्रशासन अधिकारी नीता अंधारे, पाणी पुरवठा अभियंता राहुल टाकळे, बांधकाम अभियंता योगेश हाडे, कर अधीक्षक सुधीर जाधव, कनिष्ठ रचना सहायक सलीम याकूब अशी निलंबित करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची नावे आहेत. विधीमंडळात आमदार विनायक मेटे यांनी केलेल्या लक्षवेधी सूचनेवर चर्चा झाली. या चर्चेत शशिकांत शिंदे, सतीश चव्हाण व इतर सदस्यांनी सहभाग घेतला. नगरपालिका अंतर्गत नागरिकांना सुविधा मिळत नाहीत. अधिकारी व कर्मचारी हे कर्तव्यात कसूर करतात, तसेच लोकप्रतिनिधींनी बोलावलेल्या बैठकांना गैरहजर राहतात, असा आरोप आ.विनायक मेटे यांनी केला. यावर राज्याचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सहा अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची घोषणा केली. दरम्यान, नगरपालिका अंतर्गत गैरकारभाराच्या चौकशीसाठी समिती पुनर्गठित करण्यात येईल अशी घोषणा देखील तनपुरे यांनी केली आहे.

Exit mobile version