वंचित बहुजन आघाडीचे अजय सरवदे यांच्या पाठपुराव्याला यश
बीड : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्याच बीड जिल्ह्यात समाजकल्याणमध्ये अनागोंदी कारभार सुरू असल्याचे वारंवार समोर आलेले आहे. जिल्ह्यात अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत अनियमितता करणे बीडचे समाज कल्याणचे प्रभारी सहायक आयुक्त डॉ.सचिन मडावी यांना चांगलेच भोवले आहे. त्यांच्यावर अनियमितता केल्याचा ठपका ठेवत त्यांना शुक्रवारी (दि.१०) निलंबित करण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत राबविण्यात येणार आहे अनुसूचित जाती उपयोजनेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सदस्य अजय सरवदे यांनी समाजकल्याणच्या प्रादेशिक आयुक्तांकडे केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने प्रादेशिक आयुक्तांनी औरंगाबादचे प्रादेशिक उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून चौकशीचे आदेश दिले होते. चौकशी डॉ.सचिन मडावी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर अनियमितता केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले आहे. विभागाचे अवर सचिव डी. आर. डिंगळे यांनी शुक्रवारी (दि.१०) आदेश काढले आहेत.
दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार
डॉ.सचिन मडावी यांच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले. त्यांच्यासह अन्य काही कर्मचाऱ्यांवर देखील दोषी ठरविण्यात आले आहे. लवकरच त्यांच्याही निलंबनाचे आदेश काढण्यात येणार असल्याची माहिती समाज कल्याण विभागातील सूत्रांनी दिली आहे.
राजकीय वरदहस्तामुळे कारवाईस विलंब
औरंगाबादचे समाजकल्याणचे प्रादेशिक उपायुक्त यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत डॉ. सचिन मडावी हे दोषी आढळले होते. त्यावेळी त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित होते. परंतु राजकीय वरदहस्त असल्यामुळे कारवाई होण्यास विलंब झाला, असा आरोप तक्रारदार अजय सरवदे यांनी केला आहे.
अजय सरवदे यांचा अभ्यासपूर्ण लढा
सामाजिक न्याय मंत्र्यांच्याच जिल्ह्यात समाजकल्याण विभागात अनियमितता होत असल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सदस्य अजय सरवदे यांनी सर्वप्रथम आवाज उठविला. तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाही होत नसल्याने त्यांनी सतत आंदोलने केली. कारवाई होत नसल्याने न्यायालयात देखील धाव घेतली होती. अखेर त्यांच्या अभ्यासपूर्ण लढ्याला यश आले.