mushakraj bhag 1

न्यूज ऑफ द डे

मुषकराज… 1

By Balaji Margude

August 22, 2020

मुषकराज…आज हरतालिकेचा दिवस म्हणजे आता पृथ्वीतलाकडे निघण्याची जवळजवळ वेळ झाली होती. चला आता आपल्या भक्तांना भेटायला मिळणार याचा अपार आनंद बाप्पांना झाला. कधी एकदा पृथ्वीतलावर जातो अन् माझ्या भक्ताच्या हातचे मोदक, लाडू खातो, असे बाप्पांना झाले होते. सगळं काही आवरून सवरून बाप्पा बस बॅग उचलण्याच्याच तयारीत होते. पण दूरदूर वर त्यांना मुषकराज काही दिसत नव्हते. पृथ्वीतलावर निघण्याची आस बाप्पांना एका जागी स्वस्थ बसू देत नव्हती. धोतराचा सोंगा हातात धरून बाप्पा मुषकराजच्या वाटेकडे बघत झिन्यात नुसत्या येरझार्‍या मारीत होते. बराचवेळ झाल्यानंतर मुषकराज चोर पावलांनी बाप्पाच्या पुढ्यात दाखल झाले…बाप्पा ः (घड्याळाकडे हात दाखवत) काय हे? किती वाजून राह्यले? तुमी निघायच्याच टायमला नेम्का कुठं जातावं? खाली भक्त माझे वाट बघत बसले अस्तील. चला निगा बरं लवकर…मुषक ः हो हो हो जरा दम धरा, मी काई फिराय नव्हतो गेलो? माझा बी संदूक भरून तयार व्हता. मागच्याच टायमाची यादी काढली अन् अकरा दिवस आपल्यास्नी काय काय लागतं ते सगळं भरून ठुलं व्हतं. पण तुमच्या मातोश्रींनी नविनच यादी हातात ठुली.बाप्पा ः (हसून) आमच्या मातोश्री आमची लै काळजी करत्यात. त्यांना माहितंय आम्हाला किती प्रकारचे मोदक खायला लागतात? त्यांनी नक्की तुम्हास्नी मोदक आणायचे सांगितले अस्तील.मुषक ः न्हाई ब्वा, मप्ल्याबी मनात पैला त्योच ईचार आलता. पण मातोश्रींनी दिलेली यादी पाहुनश्यानी मप्ले डोळेच गरगरायला लागले.बाप्पा ः (मुषकाकडे आश्चर्यचकीत नजरेने बघून) अस्सं! पाहुद्या मलाबी काय टिपून दिलतं यादीत.मुषक ः (पॅन्टीच्या चोर खिशात हात घालून कागदाची पुंगळी करून ठेवलेली ती यादी काढतो.) घ्या ही यादी अन् बघा आता तुमीच हे अस्लं सामान इथं कुठं भेटणार व्हतं?बाप्पा ः (हातात धरलेला धोतराचा सोंगा दातात अडकवत त्यो कागद हातात घेतात अन् वाचायला लागतात) सॅनीटायझर, मास्क, मालेगावचा काढा, दुधात टाकण्यासाठी हळद, अर्सेनिक अल्बम 30 गोळ्या, गावरान गूळ, हॅन्डग्लोज, फेस शिल्ट (यादी वाचून बाप्पा जोरात हसतात)मुषक ः तुम्हास्नी हसाय काय झालं? हे सगळं सापडता सापडता मपल्या नाकी नऊ आले. पण सामान काय गावलं नाय… अन् तुमी खुशाल हसताय?बाप्पा ः हसू नाइ तर काय करू? अरे मप्लं नाव साक्षात इघ्नहर्ता, सगळ्या जगाचं दुःखं हरण करणारा म्हणून लोक मप्ली पुजा करतात. अन् तू माझ्यासाठी हे आणायला गेल्ता व्हंय?मुषक ः औ बाप्पाऽऽ लै झालं. नका हसू. तुमी कुणीबी असा. त्यो कोरोना कुणालाच वळकत नाय. त्यानं साक्षात डोनाल्ड तात्याला पण जेरीस आणलंय. अन् तुमी इघ्नहर्ता हे मप्ल्याला म्हाईत नाय व्हयं? पण मातोश्रींनी सांगितलंय. ते सामान आणल्याबिगर जायचं नाय म्हंजी नाय.बाप्पा ः (मुषकाकडे बघत गालातल्या गालात हसत) अरे ती आमची आईच. मी देव असो नाय तर कुणी? आईचंच काळीज ते… तिला तर आमची काळजी असणारचं. तिला काय म्हाईत मीच पृथ्वीतलावर जाऊन आता त्या कोरोनाचा विनाश करणारंय… चल चल आपल्याला उशीर व्हतोय.मुषक ः (रागात) चल बील काय नाई बाप्पा… आतापस्तोर तुम्चंच एैकत आलोय…. पुढंबी एैकन… पण ऐवढ्याबारी साक्षात मातोश्रींचा आदेशय… मास्क लावल्याबिगर जायचं नाय… आपण मातोश्रींचा आदेश मोडणार न्हाय म्हंजी न्हाय…(मुषकाला इतकं रागात आलेलं बाप्पा पहिल्यांदाच पहात होते. जायला उशीर तर व्हतोय, मातोश्रींचा आदेश पण पाळावाच लागणार म्हणून बाप्पा आता काय करावं या विचारचक्रात नुसत्या येरझार्‍या मारत व्हते. तेवढ्यात त्यांची नजर खुंटीवर टांगलेल्या उपरण्यावर गेली. बाप्पानं क्षणाची उसंत न घेता ते उपरण ओढलं अन् पंतप्रधान मोदींच्या स्टाईलमध्ये तोंडाला गुुंडाळलं. अन् मुषकाला म्हणाले…)बाप्पा ः बघ बरं आता हिकडं! झालं का नाय मास्काचं काम? चल बरं आता.मुषक ः हें आणिक झ्याक झालं. आता मी बी हातरुमालानं नाक तोंड झाकतो. म्हंजी मातोश्रीचा आदेश बी पाळला जाणार अन् भक्ताला पण संदेश जाणार… पण बाप्पा…बाप्पा ः आता हे ‘पण’ काय? ‘पण-बिन’ काय नकू करू, आता निघायचं बघं… माझा जीव लै कासावीस व्हतुया…मुषक ः तसं नाय बाप्पा निघूच आपून पण ते सॅनिटायझरचं काय करायचं?बाप्पा ः नकू टेन्शन घेऊ… ते चेडेश्वरी दिस्तोय का बघ चलत चलत तिथून घेऊ…(दोघांचा संवाद संपतो अन् बाप्पा आणि मुषकराज पृथ्वीतलाकडे यायला निघतात.)(आजपासून दररोज मिश्किल कोट्या असलेलं गणपती बाप्पा आणि मुषकराज यांच्या संवादातील हे सदर वाचत रहा.)

मागील सर्व भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

मुषकराज भाग 2 : बजरंगी सॅनीटायझर…

मुषकराज भाग 3 : ‘कवडीची किंमत देत नाय’

मुषकराज भाग 4 : त्यांना वाटतं आभाळ कोसळलं

मुषकराज भाग 5 :परळी जिल्हा…

मुषकराज भाग 6 : थर्मल गन

मुषकराज भाग 7 : ‘बदका’चं डुबूक डुबूक

मुषकराज भाग 8 : बारश्याचा कार्यक्रम

मुषकराज भाग 9 : राशनच्या गव्हाचा काढा

मुषकराज भाग 10 : जिल्हा कचेरीवर मोर्चा