mushakraj bhag 4

मुषकराज भाग 4 : त्यांना वाटतं आभाळ कोसळलं

न्यूज ऑफ द डे राजकारण संपादकीय

मुषकराज : भाग 4 : त्यांना वाटतं आभाळ कोसळलं

(काल अंबाजोगाईच्या सुकुमार अन् गजरंगअप्पांची रस्त्यात लागलेली भांडणं बघून बाप्पांनी आता इथूनपुढचा प्रवास एकट्याने करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बाप्पा अन् मुषकराज परळीच्या दिशेने निघाले. बाप्पा रस्त्यानी येत असताना त्यांना जागोजागी घड्याळाचे गमजे घातलेले लोक दर्शन करायला येताना दिसत होते. बाप्पांनी मुषकराजांच्या कानात विचारलं.)

बाप्पा ः अरे काय रे आपल्या दर्शनासाठी सगळे घड्याळाचा रुमाल गळ्यात घातलेली माणसंच का येऊ लागलीत?
मुषक ः बाप्पा इथं फुलावालं कुणीच राहीलं नाही.
बाप्पा ः फुलावालं नसूद्या किमान किटलीवालं, बॅटवालं, कपाटवालं, पंख्यावालं. गॅस सिलेंडरवालं, हातावालं यापैकी कुणीच कसं नाही?
मुषक ः (जोरात हसून) हे सगळे पहिल्यापासून फुलावाल्याचे नाहीतर घड्याळीवाल्याचे… सध्या इथं कुठलंच इलेक्शन नाही. त्यामुळे बाकीचे गमजे गुंडाळून सध्या इथं फक्त एकाच गमजाचा बोलबाला सुरुये…
बाप्पा ः जा बरं जरा हळूच धांडोळा घेऊन ये… हे फुलावाले सगळे कुठे गेले? खबर काढून सांग मला…
मुषक ः (तासाभराने परत येतो) बाप्पा बाप्पा बाप्पा (धापा टाकीत) अहो काय सांगू बाप्पा अख्खी परळी पालथी घातली पण मला कुठचं फुलावाले दिसले नाहीत. नाही म्हणायला दबंग खासदार दिसल्या. पण त्यांच्याबी गळ्यात रुमाल नव्हता.
बाप्पा ः गळ्यात रुमाल नाही म्हणजे नक्कीच इथं दुसरं काहीतरी शिजत असणार… इथली भुमीच तशीये. महाराष्ट्राचं राजकारणच याच भुमीतून चालतं.
मुषक ः तसं नाही बाप्पा. फुलावाल्याचं असं म्हणणय की आमच्या पराभवात फुलावाल्यांचाच मोठा हात आहे. त्यामुळे गमजे खुंटीला टांगलेत.
बाप्पा ः पण हे असं किती दिवस खुंटीला टांगून ठेवणार? काहीतरी निर्णय घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांना पुन्हा परतावं लागेल.
मुषक ः पण त्यांना सांगणार कोण? अन् त्याा ऐकणार कोणाचं?
बाप्पा ः हो… ते पण खरंय म्हणा…
मुषक ः बाप्पा, त्यांच्यावर फक्त पिंपळाचं पान पडलंय पण त्यांना वाटतंय आपल्यावर आभाळ कोसळलंय! चर्चा तर अशीही सुरुयं की त्या पुन्हा परळीलाच येतील की नाही? इथल्या ‘संघर्ष नायका’नं त्यांच्यासाठी काही कामचं ठेवलं नाही, असं दिसून येतंय.
बाप्पा ः असं कसं म्हणता मुषकराज? काम कसं नाही? आपण आलेला पिंपळा-धायगुडा रस्ता अजून पूर्णत्वास नाही हा विषय आहे की नाही? इथली बाजार समिती कुणाच्या ताब्यात? इथली नगर परिषद कुणाच्या ताब्यात? इथली पंचायत समिती कुणाच्या ताब्यात? इथली जिल्हा परिषद कुणाच्या ताब्यात? परळी थर्मलचा विषय घ्या नाहीतर इथल्या शेतकर्‍यांचे प्रश्न मांडा? संघर्षाचा वारसा सांगत असताना असा आपला आवाज काही काळासाठी बंद ठेवल्यास राजकारणात त्याची मोठी किंमत चुकवावी लागते. एकदा लोक विसरले की विसरले…
मुषक ः हेच दिवस संघर्षाचे असे त्यांना कितीबी सांगा अन् कुणीबी सांगा? त्या ऐकतच नाहीत. पहिल्यांदा म्हणाल्या मी इथल्या लोकनेत्याच्या जयंती दिनापासून पुन्हा संघर्षाची वात पेटवणार! पुन्हा म्हणल्या मी 26 जानेवारीपासून मराठवाड्याच्या प्रश्नावर आवाज उठवणार! पुन्हा म्हणाल्या मी दिल्लीच्या प्रचाराहून परत आले की त्याच जोमाने कामाला लागणार! पुन्हा म्हणाल्या एवढा कोरोना जाऊद्या, मी पुन्हा त्याच जोशानं त्याच तडफेनं तुमच्या प्रश्नावर संघर्ष करणार. लोकनेत्याची जयंती झाली, पुण्यातिथी झाली त्या काय परळीत आल्याच नाहीत. आता तर त्यांनी नवीच घोषणा केलीय.
बाप्पा ः आता अजून कुठली नविन घोषणा? इतक्या घोषणा वाचता वाचता मीच त्यांना विसरून गेलो बघ…
मुषक ः तुमची ही अवस्था तर सामान्य जनतेची काय असेल? काल जेव्हा मी पेपरात वाचलं तेव्हाच मलाही त्यांची घोषणा कळली. त्या म्हणतात… आता मी जनतेपासून फार काळ लांब राहू शकत नाही. जनतेच्या स्वास्थ्यासाठी अन् प्रशासनाच्या नियमामुळे मला तुमच्यात येता आले नाही. मात्र पहिल्याच ताकदीने माझा झंझावात पुन्हा येणार आहे. मात्र हे लगेच होणार नाही. त्यासाठी वेळ लागणार आहे. परदेशात मुलगा स्थिरस्थावर झाल्यावर मी तुमच्यात परतणार आहे. माझ्या आयुष्यातले सगळे क्षण मी समाजाला दिले. आता समाजाचे काही क्षण मी माझ्या मुलासाठी देणार आहे. कारण मी नेता असतानाच एक माता सुध्दा आहे.
बाप्पा ः म्हणजे आपण आहोत तोपर्यंत त्या काही इकडे येत नाहीत.
मुषक ः हो बाप्पा! आपण इथे आहोत तोपर्यंतच नव्हे तर त्यांचा मुलगा स्थिरस्थावर होईपर्यंत म्हणजे किती काळ लागेल हे कुणीच सांगू शकत नाही अन् त्यांना कुणी विचारायची हिंमत पण करणार नाही. कदाचित पुढच्या पंचवार्षिकला त्या नक्की परततील.
बाप्पा ः अरे देवाऽऽऽ
मुषक ः बाप्पा त्यो बंगला बघीतला का?
बाप्पा ः कुठला रे?
मुषक ः ते बगा त्या टेकडीवर! सध्या सगळं काही तिथून सुरुये!!
बाप्पा ः मग चल मला तिकडे घेऊन, कळू दे मला जरा जिल्ह्याची खबरबातऽऽ
(बाप्पा आणि मुषक त्या लाल लाल फरशीच्या बंगल्याकडे निघतात. दुरुन तर हा बंगला एखाद्या राजवाड्यासारखाच दिसत होता.)
क्रमशः
(हे सदर केवळ मनोरंजनासाठी आहे. यातून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. यातील लिखानाचा कुठल्याही जिवीत वा मृत व्यक्तीशी संबंध नाही. असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)

मुषकराज : भाग 1 ‘चेडेश्वरी’ दिस्तोय का बघ…

मुषकराज भाग 2 ः बजरंगी सॅनीटायझर…

मुषकराज भाग 3 : ‘कवडीची किंमत देत नाय’


Tagged