land

न्यायालयाचे आदेश डावलून बालाजी देवस्थानची 66 एकर जमीन हस्तांतरीत

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव यांचा कारनामा

बीड- भू-सुधारचे उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील यांनी अख्ख्या जिल्ह्याचे प्रशासकीय वर्तुळात नाक घातले आहे. देवस्थानच्या जमीनी खालसा करून त्या कुणाच्या तरी नावच्या करून देण्याचं प्रकरण गाजत असतानाच आता धारूर तालुक्यातील बालाजी देवस्थानच्या मालकीची 66 एकर जमीनही अशाच कारस्थानाने कुणाच्या तरी घशात घालण्याचा डाव असल्याची लेखी तक्रार सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी विभागीय आयुक्तांसह मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

डॉ.ढवळे यांनी दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, बीड जिल्ह्यातील ईनामी जमीन घोटाळ्यात प्रकाश आघाव उपजिल्हाधिकारी भू-सुधार बीड हेच मुख्य सुत्रधार आहेत. धारूरच्या कटघपुरा येथील बालाजी मंदिर या देवस्थानची सुमारे 66 एकर जमीन आहे. या जमिनीबाबत न्यायालयात वाद सुरु आहे. उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालय माजलगाव यांनी या जमीनीबाबत ‘जैसे थे परिस्थिती’चे आदेश दिलेले आहेत. मात्र तरीही न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून व शासनाचा 37 कोटी रूपयांचा महसूल बुडवून बालाजी मंदिर देवस्थानची सर्वे नंबर 359, 551, 363 मधील जमीनीचा सत्ताप्रकार प्रकार वर्ग 3 (शासन दफ्तरी वर्ग 2) च्या नोंदी कमी करून त्या वर्ग-1 मध्ये हस्तांतरित करण्याचे आदेश पारित केले आहेत. याविषयी सुरेश केरबा गवळी यांनी वारंवार प्रशासनाला निवेदन दिले होते. परंतु भ्रष्टाचारास सोकलेले उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव यांनी न्यायालयाचे आदेश डावलून ह्या जमीनी वर्ग 1 मध्ये हस्तांतरीत केल्या आहेत. त्यामुळे आघाव यांना तातडीने निलंबीत करून त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे नोंद करावेत, अशी मागणी ढवळे यांनी केली आहे.

जमिनी घोटाळ्यात कठोर कारवाई करू ः जिल्हाधिकारी
देवस्थानच्या जमिनी बेकायदेशीररित्या नावे केल्या प्रकरणी चौकशी सुरु आहे. या प्रकरणात कारवाई करू. तसेच, भु-सूधारचे उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील यांच्या कार्यकाळातील आदेशांबाबतही नवीन तक्रारी येत असून त्याअनुषंगानेही चौकशी करण्यात येईल.

अल्पसंख्याक मंत्रालयाच्या आदेशाला केराची टोपली
जिल्ह्यातील इनामी जमीनी प्रकरणी तक्रारी येताच अल्पसंख्याक मंत्रालयाने गंभीर दखल घेतली आहे. याबाबत जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी माहिती सादर करण्याचे निर्देश देऊनही त्यांच्या आदेशाला उपजिल्हाधिकार्‍यांनी केराची टोपली दाखवली आहे. कोरोना काळात सुनावणी थांबल्या असे त्यांना उत्तर देण्यात आले आहे.

टिप- बातमीत दाखवलेला फोटो प्रतिकात्मक आहे.


Tagged