mushakraj

मुषकराज भाग 2 : बजरंगी सॅनीटायझर

न्यूज ऑफ द डे बीड संपादकीय

(हे सदर केवळ मनोरंजनाच्या हेतूने आहे. त्याकडे केवळ विनोद म्हणून पहावे.)
बाप्पांना घेऊन मुषकराजांनी पृथ्वीतलावर टूणकन् उडी मारली. एसट्या, विमानं, खासगी बसेस सारं काही बंद असताना एका झटक्यात इ-पास नसताना बाप्पांना ‘चेडेश्वरी’ कारखान्यापर्यंत घेऊन आलो का नाही हा अविर्भाव मुषकराजांच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहत होता. आपल्या हातातील संदूक खाली ठेवून मुषकाने असं काही अंग झटकले की अंगाची अख्खी हाडं कडंकडं वाजली. आजुबाजुला नजर टाकली. मिशिवरून हात फिरवला. शेपटी वर आकाशाकडे नेऊन खाली आपटली. ‘महाराष्ट्र केसरी’ असल्यागत जागेवर दोन उड्या मारल्या. इकडे बाप्पा मुषकाचा हा सगळा नखरा तिरप्या कटाक्षाने टिपत होते.
बाप्पा ः चल… झाल्या का तुझ्या माकड उड्या?
मुषक ः (स्वतःला सावरत) तर.. तर… इथं थोडंच थांबून जमणारंय बाप्पा? आता कुठं जायचं पैले बोला? तुमी जितं म्हणताल तितं घेऊन चलतो तुमाला.
बाप्पा ः ते मातोश्रींनी सांगितलेलं सॅनिटायझर लक्षातंय ना?
मुषक ः हो तर! त्यासाठीच तर इकडून आलो की तुमाला घेऊन.
बाप्पा ः चल मग कारखान्यात जाऊन सॅनिटायझर घेऊ पहिले.
(दोघेही चालत चालत ‘चेडेश्वरी’ साखर कारखान्यावर जातात. बाजुलाच एक किंचितसा जाड तब्येतीनं जरा बरा असलेला, मध्यम उंची, थोडी काळसर चेहरापट्टी, अंगात पांढरा शुभ्र कपडा, डोक्याला टापर गुंडाळून एक माणूस ‘शेतकरी पुत्र’ असल्यागत एका मोठ्या लाकडाला कसल्यातरी करवतीनं कापताना दिसला. त्या लाकडाचा कसला तरी सुगंध परिसरात सुटला व्हता. त्या सुगंधाचा बाप्पांनी असा दीर्घ श्वास घेऊन एक आत्मीक सुस्कारा टाकला.)
मुषक ः या बाप्पा याऽऽ याऽऽ, हे ‘चेडेश्वरी’ कारखान्याचे चेअरमन, गजरंगअप्पा गुणवणे.
गजरंगअप्पा ः (समोर साक्षात बाप्पाला पाहून गजरंग अप्पा थेट दोन्ही कर जोडून लोटांगणच घालतात) विघ्नहर्ताऽऽ गणेशाऽऽ तू जगदवंदूऽऽ तुच जगाचा दाताऽऽ, हे इश्वराऽऽ माझी मनोकामना पुरी कराऽऽऽ तुच सुखकर्ताऽऽ तुच दुःखहर्ताऽऽऽ
बाप्पा ः तथास्तू… उठा उठा गजरंग अप्पा. उठा उठा… कसं गेलं तुम्हाला यंदाचं साल?
गजरंग अप्पा ः काही इचारूच नका बाप्पा, लै म्हंजी लैच वंगळ गेलं बगा. मागच्या टायमाला तुमी आल्ते तवा नेटकाच इलेक्शनमदी आमचा ‘दबंग’ पराभव झाल्ता. म्होरलं इलेक्शन तोंडावर व्हतं. मागच्या टायमला जर तुमाली येळच नाय देता आला बगा… पण आऊंदा रिकामाच हाय! नाय म्हणाय जिल्हा परिषदेवर उपाध्यक्ष हाय, पोरायचं शिक्शन अन् आरोग्याची जबाबदारी दिलीया परळीच्या गनुभौनं. पण काय सांगू बाप्पा अशी जबाबदारी घेतली अन् असा कोरोना आला बगा… काईच करता आलं नाई आतापस्तोर…
बाप्पा ः तुझ्या सारखा एवढा निब्बर गडी अन् तुला अजून काईच कस काय नाय करता आलं?
गजरंगअप्पा ः एक केलं व्हतं बगाऽऽ पण ते चाहूल रेषावार हायत ना जिल्ह्याचे बॉस… त्यांनी काय मेळ लागू नाय दिला बगा…
बाप्पा ः कसला मेळ?
गजरंगअप्पा ः काय सांगू बाप्पा… त्या पंतप्रधान मोदीचं भाषण ऐकलं अन् एकदम येडाच झालू बगा… ते मणले आतनं निब्बर बना…
बाप्पा ः (मध्येच त्यांचं बोलणं थांबवत) आत्मनिर्भरऽऽऽ
गजरंगअप्पा ः हो हो त्येच आत्मनिब्बरऽऽ आत्मनिर्बरऽऽ जाऊद्या आपून काय त्यांच्या पक्षात नाईत. लैच त्यो शब्द पाठ केला तर परळीच्या गणुभौला उगाच संशय यायचा…
बाप्पा ः बरं पुढं काय त्याचं?
गजरंगअप्पा ः त्येच तर सांगतोय. ते म्हणले ‘लोकल टू व्होकल’ बना. त्यामुळं इथल्या इथं ‘चेडेश्वरी’च्या नावानं सॅनिटायझर बनवायला सुरु केलं. म्हणलं आता मी जिल्हा परिषदेतंय. वरतून गणुभौचा आशीरवाद कवाबी हायचं. त्यामुळं त्या चाहूल रेषावारला मणलं. हे आपलं सॅनीटायझर हाय साहेबऽऽ. हात धुयला सगळ्या सरकारी दवाखान्यात करा ह्याची खरेदी. तर त्यो गडी लैच बारीक बघाय लागला ह्या बाटलीकडं. पैले तर मणला वजन किती? म्या इच्यारलं वजनात पाह्यजे का लिटरमध्ये? तर म्हणे कशात बी द्या. पण वजनात दिलं तर 110 किलो घेऊन 1 कुंटलचंच आपण माप धरणार. लिटरमध्ये दिलं तरीबी तसंच. हे ऐकून मी तर ताडकन् उडलोच. मणलं ‘घर जाळून कोळश्याचा धंदा’ आपून नाई केला कधी? मनात मणलं ह्या गड्याला आपली 110 किलूची भानगड कुणी सांगितली?
बाप्पा ः मग काय केलं? नाहीच का मिळालं टेंडर?
गजरंग अप्पा ः अहो इथं छटाक कुणी जास्त देईना अन् मी कसा 10 किलुचा कडता सहन करीन? म्या बी लै हुशार सॅनीटायझर सगळ्या सरकारी कार्यालयात फुकट वाटलं. नमुना मनुन…
बाप्पा ः मगऽऽ जिल्ह्यात सॅनीटायझर आहे की नाही?
गजरंग अप्पा ः हो हाय तर… हे घ्या की तुमाला बी देतो. कसं वाटलं सांगा? त्या चाहुल रेषावारकडं गेलात तर त्यालाबी सांगा आपल्या सॅनीटायझरबद्दल. त्यानी भले मोठे कागदं काळे करून आमच्याच पक्षाच्या अन् त्योबी आरोग्यमंत्री असलेल्या साहेबाच्या कारखान्याचं सॅनीटायझर खरेदी केलंय. त्यामुळं आपला काई ईलाज चलला नाई बगा… गणुभौ बी काईच करू नाय शकले.
बाप्पा ः बरं बरं जाऊदे ऽऽ डोळे पूस ऽऽ तुझं बी चांगलंच होईल. चल मला पुढं जायचंय…
गजरंगअप्पा ः पुढं कुठं जायचंय? मी नेऊन घालतो की तुम्हास्नी…
(बजरंगी सॅनीटायझर हाताला चोळून बाप्पांनी खांद्यावरचं उपरणं तोंडाला गुंडाळलं अन् 1616 क्रमांकाच्या फॉर्च्यूनरने सुसाट अंबाजोगाई मार्गे परळीकडे निघाले.)
वाचा उद्याच्या अंकात…

मुषकराज : भाग 1 वाचण्यासाठी इथे क्लिक करा…

Tagged