MUSHAKRAJ

मुषकराज भाग 5 : परळी जिल्हा

न्यूज ऑफ द डे राजकारण संपादकीय

(भल्या पहाटेच आज मुषकराज आवरून सवरून बसले होते. कधी एकदा बाप्पा उठतात अन् मला त्या राजवाड्यात जायला मिळते असे मुषकराजांना झाले होते. मात्र पाच वाजले तरी बाप्पा उठायचं नाव घेईनात. त्यामुळे मुषकराजांनीच त्यांना उठवायचा निर्णय घेतला.)
मुषक ः अहो उठाऽऽ उठा उठाऽऽ बघा जरा लोक तुमच्याही आधी कामाला लागले अन् तुम्ही खुशाल झोपलाय? भक्त आले अन् त्यांना असे बाप्पा झोपलेले दिसले तर काय म्हणतील ते?
बाप्पा ः (वैतागून) झोपू दे रेऽऽ आज आपल्याला दुसरीकडं कुठंच जायचं नाही. आज फक्त राजवाड्याची खबरबात घ्यायची आहे.
मुषक ः अहो मग उठा की. राजवाडा म्हणजे तुम्हाला काय साधा वाटला का? शनिवारवाडा बघून होईल. पण राजवाडा बघायला दिवस पुरायचा नाही. अहो असा तुमच्या सारख्या वजनाचा माणूस घेऊन मला एवढ्या उंच डोंगरवर चढून जायचं म्हंजी थोडं आधी नको का निघायला. राजवाड्याकडं जायला किती त्यो चढाचा वळणाचा रस्ता. उतरायला बी तितकाच वेळ.
बाप्पा ः चल तू हो दारापाशी.. असा तयार होऊन येतो बघ…
(तासाभरात बाप्पा तयार होतात. त्यानंतर मुषक आणि ते त्या भव्य राजवाड्याकडे निघायला लागतात. तर त्यांना डोंगराच्या पायथ्यापासूनच भल्या मोठ्या गाड्यांची लांबच लांब रांग पहायला मिळते.)
मुषक ः बाप्पा आज काही सभा दिसतेय का इकडे? का बाहेरचा कुणी मोठा व्हीआयपी माणूस आलाय?
(मुषक आणि बाप्पा राजवाड्यापाशी जाऊन पोहोचतात तोच त्यांच्या कानी आवाज पडतो. “मी सांगितलेलं काम होत नाही म्हणजे? हे बघा तिकडं जिल्ह्याचं मला काय पण सांगू नका. इथं परळीत मला हे पाहीजे म्हणजे पाहीजेच. रस्त्यावरच्या कुणा कार्यकर्त्यांनी नुसता ‘मी डीएमचा माणूसंय’ इतकं म्हटलं तरी त्याचं काम झालं पाहीजे म्हणजे पाहीजे”. युट्यूबवर मुषकराजांनी ह्या आवाजातील बक्कळ भाषणं ऐकली असल्याने हा आवाज कुणाचा हे ओळखायला मुषकराजांना वेळ लागला नाही. त्या आवाजाच्या दिशेने दोघेही जातात अन् समोरचं दृश्य पाहतात तर एक भली मोठी मिटींग सुरु असते. त्यात डीएम तावातावाने अधिकार्‍यांना बोलत होते.)
डीएम ः आधी माझ्यासाठी परळी. परळीचा एकपण सामान्य माणूस मुंबईत कामासाठी आला नाही पाहीजे. मुंबईतच नाही तर बीडमध्ये सुध्दा त्यानं जायला नको. त्याचं काम इथं म्हणजे इथंच झालं पाहीजे. वाळुची गाडी असो नाहीतर राखेची… पकडायची नाही म्हणजे नाही. रिक्षा वाल्यांकडून जर हप्ता घेतला तर याद राखा. माझ्या परळीत बाल्मीकआण्णांना विचारल्याशिवाय कुठल्याच धंद्यावर रेड मारायची नाही. शेतकर्‍याचा भाजीपाला तुमच्या लॉकडाऊनमुळं विकला नाही तर तो तुम्ही विकत घ्यायचा. पणा माझा शेतकरी आणलेलं माळवं परत घेऊन जाणार नाही. तुम्ही अधिकारी 2 वर्षासाठी येताल अन् माझ्या मतदारसंघाची रचना बिघडून टाकतान. मला इथं वर्षानुवर्षे राजकारण करायचंय. मला माझ्या परिनं काम करून द्या. अन् कसले ते जीआर काढताहोऽ रात्री-बेरात्री? तिकडं जिल्ह्यासाठी काय काढायचं ते काढा. पण त्यात परळी वगळून टाकत जा. हप्त्यातून चार दिवस तुम्ही मला परळीत दिसले पाहीजेत. परळीतला एक पण माणूस बिगर टेस्टचा राह्यला नाही पाहीजे. तुम्ही इथंच बसून तुम्ही काम केलं पाहीजे. तुम्हाला इथं काम करायला जागा नसेल तर ह्या आपल्या राजवाड्याच्या परिसरात दोन दिवसात तुमच्यासाठी तात्पुरतं नवं ऑफिस उघडून देतो. आता कुणी ‘पण’… “पण बिन’ काही म्हणायचं नाही. चला लागा कामाला.
(असं म्हणून ती भली मोठी बैठक संपते. सर्वजण आपआपल्या गाड्यांकडे जायला निघतात. तेवढ्यात गर्दीतला एक अधिकारी दुसर्‍या अधिकार्‍याला म्हणतो)
पहिला अधिकारी ः सहा महिन्यापासून बघतोय. मला माझी पोस्टींग बीडमध्ये दिलीय की परळीत याचा मेळच लागत नाही.
दुसरा अधिकारी ः हो ना राव उठ सूठ परळी, परळी, परळी जीव वैतागून गेलाय.
पहिला अधिकारी ः अहो हे तर हे… पण ह्याचे ‘पीए’ पण परळीलाच बोलवून घेत आहेत. ह्यांच्या ‘पीए’चं म्हणजे असं झालंय.. घरचं झालं थोडं अन् व्याह्यानं धाडलं घोडं…
दुसरा अधिकारी ः अहो ह्याचं घोडं परवडलं. घोड्याला दोन टाईम खुराक घालू, वाटलं तर त्याचं शेण काढू पण हे पीए लोकांनी आपल्याला परळीत विनाकारण बोलावून घेऊन बेजारी काढणं म्हणजे हे अतिच झालं. त्यातला एक ‘चंडू’ तर त्याचं काम नाही ऐकलं की फोन लावतो अन् म्हणतो तुम्हाला साहेबांनी परळीला बोलावलंय. अन् तिथं गेल्यावर म्हणतो आताच साहेब गेले. तुम्ही उद्या या. बरं साहेबांनी निरोप दिलाय की नाही हे साहेबांना विचारायची सोय पण नाही. आधीच इथं आठवड्यातून चार दिवस मुक्कामी. त्यात पुन्हा साहेबांनी बोलावलेच्या नावावर पीएचा भुंगा मागं लागतो.
(दोन अधिकार्‍यांमधील हा संवाद मुषकराज आणि बाप्पांनी कान मोठे करून ऐकला. ते निघून गेल्यानंतर बाप्पा आणि मुषकराज ऐकमेकांकडे बघतात.)
मुषक ः कळली का तुम्हाला जिल्ह्याची खबरबात?
बाप्पा ः खबरबात बी कळली अन् बीड जिल्ह्याचा परळी जिल्हा करून ठेवलाय हे बी लक्षात आलं.
(तेवढ्यात या दोघांकडे साक्षात डीएम साहेबांचं लक्ष जातं.)
उर्वरित उद्याच्या अंकात…

(हे सदर केवळ मनोरंजनासाठी आहे. यातून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. यातील लिखानाचा कुठल्याही जिवीत वा मृत व्यक्तीशी संबंध नाही. असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)

मुषकराज : भाग 1 ‘चेडेश्वरी’ दिस्तोय का बघ…

मुषकराज भाग 2 ः बजरंगी सॅनीटायझर…

मुषकराज भाग 3 : ‘कवडीची किंमत देत नाय’

मुषकराज भाग 4 : त्यांना वाटतं आभाळ कोसळलं