mushakraj

मुषकराज भाग 6 ः थर्मल गन

न्यूज ऑफ द डे राजकारण संपादकीय

(साक्षात बाप्पा आपल्या दारात आलेले पाहून ‘डीएम’ साहेबांचा आनंद गगणात मावत नव्हता. त्यांच्यापासून अवघ्या 10 फुटावर बाप्पा उभे होते. कधी एकदा हे दहा फुटाचं अंतर कापतो अन् बाप्पांना साक्षात मिठी मारतो असं डीएम साहेबांना झालं होतं. ते मिठी मारण्यासाठी बाप्पांच्या अंगावर झेपावणार तोच त्यांना 11 जुनचा दिवस दिवस आठवला. ते जागेवरच थबकले. उजवा हात मनगटापासून वळवून अंगातल्या नेहरु खिशात घातला. त्यातून एक ‘एन 95’ चा मास्क काढला अन् तोंडावर चढवला.)
डीएम ः बाप्पाऽऽ मी तुमचा भक्त अन् तुम्ही माझे देवऽऽ पण या दोघांमध्ये पडलेलं अंतर मला सहन नाही होत.
बाप्पा ः होईलऽ होईलऽऽ सगळं काही पुर्वीसारखं होईल.
डीएम ः पण कधी होईल? पाच महिने झालं आता हेच ऐकतोय. काही काम धंदा पण सुचत नाही. मुंबईला जायचं झालं तरी आता स्वतःच्या फाईल स्वतःच न्याव्या लागतात. साधा ‘पीए घेऊन जाता येत नाही की ड्रायव्हरला चल म्हणता येत नाही. तरी बरं आमच्या ताईसाहेब, महाराष्ट्राच्या संघर्षदिदि सभागृहात नाहीत. नाहीतर त्यांनी प्रश्न टाकायचे अन् आम्ही उत्तरं द्यायची, असंच चाललं असतं अधिवेशनात…
बाप्पा ः तुमच्या संघर्षदिदिला आमचा सांगावा धाडा… साक्षात आम्ही येत आहोत म्हणा… त्यांची सगळी खबरबात आम्हाला मुषकानं सांगितलीच आहे. इकडं येताना…
डीएम ः (दोन्ही कानाला खडे लावून) नाही बुवा बप्पाऽऽ आपल्याच्यानं हे कदापि शक्य नाही. एकवेळ तुम्ही म्हणा… ती नगरची रेल्वे परळीला आणऽ मी असा जातो अन् अशी रुमालानं बांधून ओढीत आणतो. पण हे निरोपाचं काम काय सांगू नका… अहो निरोप कुठं म्हणून अन् कुणाकडं म्हणून देऊ? कोरोना कुठं नाही? मुंबईत एक ठिकाण एक वस्तु अशी राहीली नाही की तिथं कोरोना नाही. पण आमच्या ताईसाहेब बिल्डींगमध्ये ज्या जाऊन बसल्यात ते आजपर्यंत तेथून खाली उतरायलाच तयार नाहीत. मला वाटतंय त्यांना तिथून मंत्रालय दिसतंय…
(मध्येच मुषकराज बोलतात)
मुषक ः त्यांना तिथून मंत्रालय दिसतंय अन् तुम्हाला या राजवाड्यातून सगळा बीड जिल्हा दिसतोय… म्हणून तर ते आता जिल्ह्याचं सगळं ऑफिस इकडं आणायच्या विचारात आहेत. मघाशी मिटींगमध्ये काय सांगत होते ऐकलं नाही का?
डीएम ः बाप्पाऽऽ म्हणजे तुम्ही आमची मिटींग लपून-छपून ऐकत होतात तर… ही तर चिटींग झाली…
मुषक ः चिटींगऽऽ? कसली चिटींगऽऽ? आम्ही नुसतं ऐकलं तरी चिटींग अन् तुम्ही ते काय ताप मोजायच्या थर्मल गन घेतल्या त्याचं पुढं काय केलं? ती नाय का चिटींग..? त्याचा बाजार भाव काय? तुम्ही खरेदी केल्या कितीला? आता त्या कुठयंत? सांगा सांगाऽऽ? द्या उत्तर! शेवटी त्या माजलगावचा ‘एकच वादा, नाही कुणाचा फायदा’ असलेले विकास पुरुष ‘अंधारदादा’ यांच्या हातात दिसल्या होत्या. तिथून त्या कुठं गेल्या कुणास ठाऊक?
(मुषकाच्या या प्रश्नानं डीएम साहेब घामाघूम झाले. ते घाम पुसण्यासाठी रुमाल शोधू लागले. उजवा हात दुमडून नेहरू शर्टच्या खिशात घातला पण तसाच रिकामा बाहेर काढला. पुन्हा डावा हात घातला पण तोही तसाच बाहेर काढला. साहेबांच्या खिशात रुमाल नाही हे बाजुलाच मोबाईलवर बातम्या करीत ‘शांत’ उभ्या असलेल्या ‘पीए’च्या लक्षात आलं. त्यांनं हातात असलेल्या फोल्डींग फाईलमधून साहेबांसाठीचा ठेवणीतला रुमाल बाहेर काढला. त्यावर सॅनीटायझर फवारलं अन् हात पुढे करून साहेबांच्या पुढ्यात ठेवला. साहेबांनी घाम पुसला थोडसं पाणी प्यायले अन् … मोठ्ठा पॉज घेऊन बोलायला लागले.)
डीएम ः (बोलणं कसलं थेट भाषणच) या तुमच्या डीएमने एक पैसा जरी इकडे तिकडे केलेला असेल तर सिध्द करून दाखवावा… मी राजकारण सोडून देईल.. आमच्या विरोधकांना थर्मल गन म्हणजे चिक्कीची पाकिटं वाटली काय खाऊन टाकायला? अरे त्या गन आज नाही तर उद्या कामालाच येणारंयत… त्यांचे सेल उतरले असतीलऽऽ तर तातडीनं मी डीपीडीसीमधून त्यासाठी 1 कोटीचं बजेट आज आत्ता या क्षणाला मंजुर करत आहे. (या लोकप्रिय घोषणेनं आजुबाजुला टाळ्यांचा प्रचंड कडकडाट) आणि हो इतकंच नाही तर जायकवाडीचं पाणी नागपुरात आणून उंची वाढवणार… बावी, चांदापूर 2, दौंडवाडी, सावरगाव, घाटनांदूर अन् उजनी पाटीचा साठवण तलाव अन् मांजरा नदीवर दोन बॅरेजेस हे मी शेतकर्‍यांसाठी दिलेलं वचनंय. अन् बचत गटाच्या महिलांसाठी परळीत भव्य बचतगट भवन तयार करणारंयऽऽ सव्वा दोनशे गाळे फक्त महिला बचतगटाला फुकट देणारंय…(पुन्हा टाळ्या) चांगलं कामंय का नाही सांगा? मग मी चांगलं करतोय तर आमच्या विरोधकांना जमतच नाही… म्हणे थर्मल गन कुठंयत?
(डीएम साहेबांचं भाषणं सुरु असतानाच धोधो पाऊस येतो. तरीही साहेबांचं भाषण सुरुच असतं. आता तर त्यांनी डोक्यावर धरलेली छत्री बाजुला केलेली असते. इकडे गणपती बाप्पा अन् मुषक एकमेकांकडे बघतात… जनता हे सगळं तल्लीन होऊन ऐकताना पाहून आपणच चुकलो का काय? असे भाव दोघांच्याही मनावर उमटतात. डीएम पक्के राजकारणी झालेत असं म्हणून ते परळीचा निरोप घेऊन माजलगावच्या दिशेनं निघतात.)
(टिप- हे सदर केवळ मनोरंजनासाठी आहे. यातून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. यातील लिखानाचा कुठल्याही जिवीत वा मृत व्यक्तीशी संबंध नाही. असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)

मुषकराज : भाग 1 ‘चेडेश्वरी’ दिस्तोय का बघ…

मुषकराज भाग 2 ः बजरंगी सॅनीटायझर…

मुषकराज भाग 3 : ‘कवडीची किंमत देत नाय’

मुषकराज भाग 4 : त्यांना वाटतं आभाळ कोसळलं

मुषकराज भाग 5 :परळी जिल्हा…

Tagged