mushakraj

मुषकराज भाग 8 : बारश्याचा कार्यक्रम

बीड राजकारण संपादकीय

बालाजी मारगुडे, बीड मो. 9404350898

(केपासुरी-खाटवडगाव रोडवर चार एकरमध्ये विस्तीर्णपणे असलेल्या पंचतारांकित हॉटेल टाईप बंगल्याबाहेर येऊन बाप्पा अन् मुषकराज थांबतात. बंगल्याच्या आतील आवारात भली मोठी गर्दी झालेली असते. गर्दी पाहून बाप्पा बोलतात.)
बाप्पा ः मुषका आपण येणार असल्याची वर्दी दिली होती का?
मुषक ः नाही बाप्पा…
बाप्पा ः मग ही गर्दी कसली?
मुषक ः बाप्पा आज इथं बारश्याचा कार्यक्रम आहे.
बाप्पा ः मग तर चांगल्या मुहुर्तावर आलो म्हणायचं आपण…
मुषक ः (मनातल्या मनात… इथं दरवर्षीच बारश्याचे कार्यक्रम होतात बाप्पा)
बाप्पा ः ऑऽऽऽ काही म्हणाला का तू मुषका..?
मुषक ः नाही ब्वॉ… आत गेल्यावर दिसेलच की तुम्हाला एकाचं बारसं अन् दुसर्‍याचं श्राध्द घातलेलं…
बाप्पा ः अस्सं म्हणतोसऽऽ मग आपण हा कार्यक्रम जरा दुरुनच बघूया…
मुषक ः जशी तुमची मर्जी बाप्पा… नाहीतरी इथं दुसर्‍याची मर्जी चालतच नाही. इथून फक्त एकच आवाज बाहेर पडतो…
(असं म्हणून ते हा कार्यक्रम दुरुनच बघतात. तेवढ्यात छोटेखानी स्टेजवर बसलेला बप्पी लहरी सारखा दिसणारा एक जाडजूड माणूस खिशातून माणिकचंद काढतो, ती फोडतो अन् मोठ्या आत्मविश्वासानं तोंडात रिचवतो. तेवढ्यात कुणीतरी माईकमध्ये ‘एकच वादा, ईकास दादा’ अशी घोषणा देत त्यांना माईकवर बोलण्यासाठी निमंत्रीत करतं. ईकासदादा आपल्या कमरेपासूनचा सगळा भार पाठीमागे आपल्याच दोन हातावर देऊन बसलेले असतात. नाव पुकारल्यानंतर ते एक हात मोकळा करून दुसर्‍या हातावर आपला सगळा भार देऊन उठायला उभे राहतात.)
ईकासदादा ः जमलेल्या माझ्या मतदार बांधवांनोऽऽ यंदाची माझी शेवटची निवडणूक म्हणून तुम्ही मला मोठ्या मतानी निवडून दिलं. आता त्यातून उतराई म्हणून काही कामांचं आपल्याला नामकरण म्हणजे बारसं करायचंय. या शहर पालिकेत 54 कोटी रुपये आले. पण तिथं 22 मालकं झाल्याने ईकासाला खीळ बसली. त्यामुळे तिथला निधी वळवून आपल्याला इकडं बांधकाम खात्याकडं आणून तिथून काम करून घ्यायचीत. त्यामुळे आजपासून या शहर पालिकेचं नाव ‘माजलगाव कंगाल पालिका’ असे मी करत आहे.
(त्यांच्या या बारश्यानं खाली बसलेल्यांमध्ये कुजबूज सुरु होते.)
डीपक ः (मध्येच उठून) इकासदादांचा हा नामकरण ठराव हमे ‘मंजूर’ है
मजबुरभाई ः मंजूर कैसे मंजूर? पहले तो ये बात नही हुई थी! ये तो सरासर धोका हुआ है…
(मध्येच एकाची लेट एन्ट्री होते. कुणीतरी पुटपुटला सरका सरका अध्यक्ष आले अध्यक्ष आले… डोक्यावर टक्कल, आवाज तेज तर्राऽर लांबूनच ते बोलायला लागतात.)
अध्यक्ष (गजेंद्र पाटील) ः पंगतीला तर नाहीत बोलवत पण निदान बारसं करताना पाळणा हालवायला तरी बोलवा. मागच्या टायमाला सुतगिरणीचं श्राध्द घालून टेक्सटाईलचं बारसं केलं… टेक्सटाईलचं श्राध्द घालून कोल्हेकुईचं बारसं केलं केलं. (तल्लेतुलाई… गर्दीतला एकजण मध्येच बोलतो.) हो हो तेच तल्लेतुलाई. ऊसावर जास्त बोलू बोलू कोल्हेकुई व्हंतय… जरा समजून घ्या! पहिल्यांदा ग्राहकभांडार म्हणले दोन वर्षात त्याचंही श्राध्द घातलं. तिथच खतं विक्रीचं बारसं केलं. त्याचंही श्राध्द घातलं. अन् आता जागृती बँक म्हणले. आता बँक म्हणता म्हणता कुणी पाण्याचं एटीएम म्हणतंय तर कुणी आंबे पिकवायची बागवानाची आढी म्हणतंय. यातल्या एका तरी नामकरणाला बोलावायचं… नुसत्या काश्या उपटायला अन् पळाट्या येचायला आम्हाला बोलवता का? कापूस फुटल्यावरबी कधी कधी आवतंन देत जा… ह्यो सगळा बारश्याचा सोहळा म्हणजे रान आम्ही तयार करायचं. त्यात तूर आम्हीच पेरायची, तिच्यावर फवाराही आम्ही मारायचा. तुरीचं खळं व्हायच्या टायमाला ह्यांनी धडकायचं. अन् तुरी मोंढ्यात घालून आपल्या हवाली साटाभर तुर्‍हाट्या द्यायच्या… आता हे नाही जमणार…
(तितक्यात सिताफळाच्या बागेतून एकजण थेट स्टेजवरच धडकला. त्यांची फ्रेंच कट पांढरी दाढी बघून सुत्रसंचालकाने अंगात दहा वाघाचं ‘धैर्य’आणून ‘विनयशील काकांचं स्वागत आहे’, अशी अलाऊंन्सिंग केली. काका तिकडूनच तापून आले होते. त्यांनी आल्याबरोबर इकासदादाला बाजुला केलं अन् माईकचा ताबा घेतला)
काका ः गजेंद्र तू एकदम राईट बोलला… आतापस्तोर मी आपल्या तुर्‍हाट्या घेऊनच बीडला पळत व्हतो… पण आता जमणार नाही… मला आता ह्या ठिकाणाहून तुमाला काही सांगायचंय… आज मी माझ्या पोरांचंच बारसं करणारंय… माझ्या पोराचं नाव उदयसिंह पण आजपासून तो नुसता उदयसिंह नसून आमदार उदयसिंह असेल…
बंगलताई ः (मध्येच उठून तावातावाने) ते जमणार नाही… ह्यांची बारी झाली की आधी माझा नंबर… मग माझ्या सुनेचा नंबर… मग तुमचा उदयसिंह तुम्हाला कुठं हत्तीवर नेऊन बसवायचा तर बसवा…
(जाहीर वाद होत असल्याचं पाहून कार्यक्रम आटोपता घ्यावा लागणार असं ईकासदादाच्या लक्षात येताच त्यांनी माईकचा ताबा घेतला.)
ईकासदादा ः मंडळी हा बारशाचा कार्यक्रम इथंच संपला असं जाहीर करतो.
गजेंद्र ः एवढी लोक बोलविलेऽऽ आता जेवणाचा काही कार्यक्रम हाय का नाही..?
ईकासदादा ः मला इकतो का तू इकतो? आधीच कारखाना तोट्यातंय… यंदा शेतकर्‍यांना द्यायला पैसे नाहीत. अजून इलेक्शनचा खर्च निघाला नाही आणि तू म्हणतो जेवण आहे की नाही? आचार्‍याला काय देऊ..?
गजेंद्र ः ह्याला म्हणतेत ‘कन्हून केळ खाणं…’ बिचारी शहरसेवकं मेली नुसती ‘खुरं’ खाऊ खाऊ…
(इकडे दुरुनच हा कार्यक्रम पहाणारे मुषक अन् बाप्पांना 20 वर्षात इकास किती मोठा झालाय हे लक्षात येतं. ते मान हलवून मुषकाला पुढच्या मुक्कामी निघण्याची आज्ञा करतात…)
(हे सदर केवळ मनोरंजनासाठी आहे. यातून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. यातील लिखानाचा जिवीत वा मृत व्यक्तींशी संबंध नाही. असलाच तर तो निव्वळ योगायोग समजावा.)

मुषकराज : भाग 1 ‘चेडेश्वरी’ दिस्तोय का बघ…

मुषकराज भाग 2 ः बजरंगी सॅनीटायझर…

मुषकराज भाग 3 : ‘कवडीची किंमत देत नाय’

मुषकराज भाग 4 : त्यांना वाटतं आभाळ कोसळलं

मुषकराज भाग 5 :परळी जिल्हा…

मुषकराज भाग 6 ः थर्मल गन

मुषकराज भाग 7 ः ‘बदका’चं डुबूक डुबूक

Tagged