beed-mandir

दार उघड उद्धवा दार उघड!

न्यूज ऑफ द डे बीड

बीडसह जिल्हाभरात भाजपचे घंटानाद आंदोलन
बीड : राज्यातील देवस्थाने, धार्मिक स्थळे खुली करण्याची मागणी सातत्याने होत आहे. केंद्र सरकारनेही 4 जून 2020 रोजी नियमावलीसह परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार बहुसंख्य प्रमुख देवस्थाने सुरू झालेली आहेत. देवस्थाने, धार्मिक स्थळे सुरू करण्याच्या मागणीसाठी भाजपसह अन्य संघटनांच्यावतीने आज (दि.23) रोजी सकाळी बीड शहरासह जिल्हाभरात घंटानाद आंदोलन करण्यात आले.

   राज्यातील मंदिरे सुरु करावेत अशी मागणी संत, महंत व विविध धार्मिक संघटनांनी मागणी करूनही अद्याप राज्यसरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. अनेक व्यवहार सुरु झाले पण मंदिराचा विषय गांभीर्याने हाताळला जात नाही. मंदिराच्या अर्थव्यवस्थेतून अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. या मागणीकडे राज्यसरकारचे लक्ष वेधण्यासाठी बीड शहरातील बालाजी मंदिर, मोंढा रोड येथे सकाळी 11 वाजता भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वाखाली मंदिर उघडण्यात आले. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन सोशल डिस्टन्सिंग व मास्क लावून हे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, जिल्हाभरात आंदोलनस्थळी ‘दार उघड उद्धवा दार उघड’ अशा घोषणा देण्यात आल्या.

केज, अंबाजोगाईत आंदोलन
केज तालुक्यात भाजपचे तालुकाध्यक्ष भगवान केदार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले असून सर्व पदाधिकार्‍यांनी हजेरी लावली होती. तर अंबाजोगाई येथील आंदोलनात भाजपचे युवा नेते अक्षय मुंदडा यांच्यासह पदाधिकार्‍यांनी सहभाग नोंदविला. यावेळी मंदिरे उघडण्याच्या मागणीचे निवेदन देखील प्रशासनाला सादर करण्यात आले आहे.

Tagged