DADAJI-BHUSE

बोगस बियाणे प्रकरणी अहवाल द्या; पीक विमा कंपनीची नियुक्ती करा

न्यूज ऑफ द डे बीड शेती

बीड : जिल्ह्यात बियाणात बोगसगिरी व खतांच्या साठेबाजीचे प्रकार वाढले असून शेतकर्‍यांच्या तक्रारींचा पाऊस झाला आहे. याबाबत राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी बीडमध्ये आज (दि.22) जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागाचा आढावा घेतला. यावेळी बोगस बियाणे प्रकरणी अहवाल सादर करा, याशिवाय शेती नुकसानीचे तातडीने पंचनामे सुरु करण्याचे निर्देश कृषी मंत्री दादा भुसेंनी आढावा बैठकीत दिले.
   आढावा बैठकीस जिल्हाधिकारी राहूल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, जिल्हा सहकारी निबंधक शिवाजी बडे, जिल्हा गुणनियंत्रक अधिकारी जोगदंड आदींची उपस्थिती होती. कृषी मंत्री दादा भुसे यांनी जिल्ह्यातील कृषी विभागाची परिस्थिती जाणून घेतली.
     यावेळी बोलताना म्हणाले, जिल्ह्यात अनेक शेतकर्‍यांचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यांच्या शेती नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार कृषी विभागाकडून उद्यापासून (दि.23) बीड जिल्ह्यातील पंचनामे सुरु करण्यात येतील असे कृषी विभागाने सांगितले आहे. तसेच, बोगस बियाणे प्रकरणी कृषी शास्त्रज्ञ व तालुकास्तरीय समित्यांनी पाहणी प्राथमिक अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले. खतांची साठेबाजी करणार्‍या कृषी दुकानांविरोधात कठोर कारवाई करण्याच्याही सूचना त्यांनी यावेळी केल्या. या बैठकीस सर्व उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते.

पीक विमा कंपनीच्या नियुक्तीचे कृषीमंत्र्यांचे निर्देश
जिल्ह्यातील खरीप आणि रब्बी हंगाम पिकासाठी विमा कंपनीची तात्काळ नियुक्ती आणि जिल्ह्यातील शेतकर्‍यांना कापूस व तूर पिकांचा विमा मिळणे, कृषी विभागातील विविध कामांसाठी देय निधी उपलब्ध करून देणे आणि बीड जिल्ह्यातील 75 शेतकर्‍यांनी आत्महत्या केली त्या शेतकरी कुटूबांना मदत करणे या विषयावर माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी राज्यांचे कृषीमंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चा केली. जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे प्रश्न तातडीने सोडवावेत अशी मागणी केली आहे. कृषीमंत्री दादा भुसे यांनी मंत्रालयातील सचिवांना तात्काळ संपर्क साधून पिक विमा कंपनीच्या नियुक्तीबाबत तात्काळ निर्देश दिले आहेत.

हेक्टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई द्या : अ‍ॅड.राहूल वायकर
जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे बोगस बियाणांमुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना हेक्टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी निवेदनाद्वारे संभाजी बिग्रेडचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.राहूल वायकर यांनी केली आहे.

Tagged