uddhav

महाराष्ट्राचा चीनला दणका, 5000 कोटींच्या तीन प्रकल्पांना स्थगिती

देश विदेश महाराष्ट्र

मुंबई: राज्यातील महाविकास आघाडीने चिनी कंपन्यांबरोबर केलेल्या तीन मोठ्या प्रकल्पांना स्थगिती दिली आहे. मॅग्नेटीक महाराष्ट्र 2.0 या कार्यक्रमाअंतर्गत चिनी कंपन्यांशी करण्यात आलेल्या पाच हजार कोटींच्या प्रकल्पांना स्थगिती देण्यात आली आहे.

केंद्र सरकारशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या करारांवर आधीच सह्या झाल्या होत्या. परराष्ट्र मंत्रालयाने या पुढे चिनी कंपन्यांशी कोणताही करार करु नये असा सल्ला दिला आहे, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी एका नामांकित वृत्तपत्राला दिली आहे. हा करार सीमेवर 20 भारतीय जवान शहिद होण्यापूर्वीच झाला होता. मात्र, चीनच्या कुरघोड्या सुरू झाल्यानंतर चीनबरोबर कोणताही करार करू नये असा पवित्रा भारताने घेतला आहे.

काय होते करार?

15 जून रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडलेल्या बैठकीला चीनचे भारतीय दूत सन विडोंग सुद्धा उपस्थित होते. यावेळी ग्रेट वॉल मोटर्स या वाहननिर्मिती क्षेत्रातील कंपनीबरोबर 3 हजार 770 कोटींचा करार झाला. या कराराअंतर्गत जीएमडब्ल्यू पुण्यातील तळेगावमध्ये वाहननिर्मिती कारखाना उभारणार होती. महाराष्ट्र सरकार आणि चिनी कंपन्यांदरम्यान झालेल्या तीन करारांपैकी हा सर्वात मोठा करार होता. त्याच प्रमाणे पीएमआय इलेक्ट्रो मोबॅलिटी या कंपनीने फोटॉन या चिनी कंपनीच्या सोबतीने एक हजार कोटींचा कारखाना सुरु करण्यासंदर्भात करार केल्याचे सरकारने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं होतं. या करारामधून दीड हजार जणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे म्हटलं होतं. याचबरोबर हेन्गेली इंजिनियरिंगने राज्य सरकारबरोबर 250 कोटींची गुंतवणूक करण्यासंदर्भात करार केला होता. तळेगाव येथील कंपनीचा दुसर्‍या टप्प्यात विस्तार करण्यासंदर्भाती या करारामधून 150 जणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आलं होतं.

मॅग्नेटीक महाराष्ट्र 2.0 च्या अंतर्गत आणखी कोणते करार झाले आहेत?

करोनानंतर राज्यातील अर्थचक्राला गती देण्यासाठी मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 च्या माध्यमातून सरकारने गुंतवणूकदारांबरोबर करार केले. याअंतर्गत 12 करार करण्यात आले. त्यामध्ये सिंगापूर, दक्षिण कोरिया, अमेरिकन कंपन्यांबरोबरच भारतीय कंपन्यांबरोबरही करारांवर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या होत्या. आता तीन करार स्थगित करण्यात आल्यानंतर उर्वरित नऊ करारांवर काम सुरु असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केलं आहे.


Tagged